शाळा हा प्रत्येकाच्या जवळचा विषय. जेव्हा शाळेत असतो तेव्हा मोठे कधी होणार असा प्रश्न प्रत्येकालाच असतो. पण एकदा का मोठे झालो की शाळेतल्या त्या आठवणी मनात कायम राहतात.

स्पृहा जोशीलाही हा अनुभव काही दिवसांपूर्वी आला. त्याचे झाले असे की, नुकतीच स्पृहाने प्रमुख पाहुणी म्हणून एका शाळेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्यावेळी स्पृहा शाळेत पोहोचली, त्यावेळी तिला तिच्या शाळेच्या अनेक गोष्टी आपसूक आठवल्या. एक आठवण आली की त्यामागून अनेक आठवणी या येतच राहतात. तिच्या आठवणीतली एक गोष्ट तिने सोशल मीडियावर शेअरही केली आहे.

इन्स्टाग्रामवर तिने त्या शाळेतल्या कार्यक्रमाचा फोटो टाकत म्हटले की, परवा चेंबूरच्या ‘आमची शाळा’ मध्ये वॉर्ड लेव्हल विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते. इतक्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.. बालमोहनमध्ये असताना दरवर्षी ही विज्ञान प्रदर्शनं, त्याबरोबरचे सहशालेय उपक्रम.. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समूहगीतगायन स्पर्धा.. सगळ्यांच्या तालमी, बुडवलेले तास, रात्ररात्र केलेली जागरण, हरण्यातली गंमत, जिंकण्यातला आनंद, शिक्षकांच्या चेहऱ्यावरचे कौतुक… मला आम्ही केलेला पर्यावरणाचा एक आणि ‘सिग्नलविरहित चौक’ नावाचा प्रोजेक्ट अजूनही लक्षात आहे.. खडानखडा!

तिच्या या मेसेजवर ६ हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत. एवढेच बोलून ती थांबली नाही. स्पृहाने यावेळी शाळेच्या आठवणीत रमण्याची संधी दिल्याबद्दल नंदू कदम सरांचे आभारदेखील मानले आहेत. त्याचबरोबर स्पृहाने पैसा पैसा, लॉस्ट अ‍ॅण्ड फाउण्ड, बायस्कोप असे अनेक सिनेमे केले आहेत.