जिच्या कारकीर्दीची सुरुवातच ‘क’ची बाराखडी असलेल्या मालिकांपासून झाली आणि जिने ‘क’वरून सुरू होणाऱ्या तीन महामालिकांमधून ठसा उमटवला त्या अभिनेत्री सुरवीन चावलाने कधीच टीव्ही सोडून आपली पावलं रुपेरी पडद्याकडे वळवली होती. मात्र आता चुकूनही टीव्हीवर काल्पनिक मालिकांकडे जायचं नाही, असा निर्धार सुरवीनने केला आहे. अनिल कपूर निर्मित, अभिनय देव दिग्दर्शित ‘२४’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात चमकणारी आणि त्याच वाहिनीलर ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोत स्पर्धक म्हणून दाखल झालेली सुरवीन आपल्या मालिकांवर कडाडून टीका करते. आपल्याकडे टेलीव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या काल्पनिक मालिका या अत्यंत बुरसटलेल्या विचारांच्या आहेत, असं सुरवीन म्हणते.
‘मी टेलीव्हिजनवर मालिकांमधूनच सुरुवात केली आहे. पण तेव्हा काय आणि आज काय आपल्या मालिका पाहिल्यात तर काय देतो आपण आपल्या तरुण पिढीला?’ असा प्रश्न पडतो असं ती म्हणते. आपल्या मालिका केवळ बुरसटलेल्या नाहीत तर अत्यंत नकारी विचार देणाऱ्या असल्याची कडक टीका सुरवीनने केली. एकाच घरात दोन सख्खे भाऊ आनंदाने नांदू शकत नाहीत. एकाच घरात राहून सासू-सुना, नणंद-भावजया एकमेकींना विष घालून मारायचा प्रयत्न करतात. नाहीतर भावाभावांमध्ये भांडणं लावून संसार उद्ध्वस्त करताना दिसतात. आपल्याही नकळत टीव्हीसमोर बसलेली लहान मुलं, महाविद्यालयात जाणारी मुलं यांच्यावर आपण हे कळत-नकळत विद्वेषाचं बीज पेरतो आहोत हेच आपल्या लक्षात येत नाही, असं ती म्हणते. ना मालिकांचे निर्माते, ना वाहिन्या या वरवर साध्या दिसणाऱ्या पण गंभीर अशा समस्येचा विचार करतात, असा आपला अनुभव असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे काहीही झालं तरी काल्पनिक मालिकांमध्ये काम करणार नाही. कौटुंबिक तर त्याहूनही नाही, असं ती स्पष्ट करते.
सुरवीनने बॉलीवूडमध्ये आपला मोर्चा वळवला असला तरी एक टीव्ही अभिनेत्री ते रुपेरी पडद्यावरची अभिनेत्री हा पल्ला गाठण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला असल्याचे ती म्हणते. ‘अग्ली’, ‘हेट स्टोरी २’, ‘क्रिएचर’, ‘वेलकम बॅक’ अशा चित्रपटांमधून सुरवीनने काम केलं आहे. यामध्ये ‘अग्ली’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर काम करायची संधी मिळाल्याबद्दल ती स्वत:ला भाग्यवान समजते. एकीकडे अनुरागसारखा दिग्दर्शक आहे जो कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातला जो संवाद आहे तो महत्त्वाचा मानतो. दिग्दर्शक जेव्हा कलाकाराला एखादी कल्पना समजावून सांगतो तेव्हा त्यानेही त्याच ताकदीने ती उचलणं हे अनुरागसाठी महत्त्वाचं असतं आणि तो त्या पद्धतीनेच क लाकारांकडून काम करून घेतो. त्यामुळे शिकण्यासाठी आणि अभिनेत्री म्हणून स्वत:लाच विकसित करण्यासाठी ही प्रक्रिया खूप उपयोगी पडल्याचं तिने सांगितलं. तर दुसरीकडे ‘२४’च्या सेटवर अभिनयसारख्या मोकळ्या विचारांच्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं हाही खूप आनंददायी अनुभव होता, असं ती म्हणाली. अभिनय आपल्या कलाकारांना स्वातंत्र्य देतो, त्यांना मोकळीक देऊन तो त्यांच्याबरोबर काम करतो. त्यामुळे त्याच्या सेटवर आपण जणू एका कुटुंबाचा भाग असल्याची भावना जास्त असते, असं सुरवीनने सांगितलं. सध्या या दोन कार्यक्रमांमुळे ती पुन्हा छोटय़ा पडद्यावर दिसत असली तरी पुन्हा मागे वळून मालिकांपर्यंत जाणार नाही, असं ती ठामपणे सांगते.

मी टेलीव्हिजनवर मालिकांमधूनच सुरुवात केली आहे. पण तेव्हा काय आणि आज काय आपल्या मालिका पाहिल्यात तर काय देतो आपण आपल्या तरुण पिढीला?’ असा प्रश्न पडतो. आपल्या मालिका केवळ बुरसटलेल्या नाहीत तर अत्यंत नकारात्मक विचार देणाऱ्या आहेत.
सुरवीन चावला