सोशल मीडियावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून #MeToo हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वी विनस्टिनच्या लैंगिक अत्याचारांचं पितळ उघडे पडल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. ज्याअंतर्गत बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयीची माहिती दिली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रीही मागे राहिल्या नाहीत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, विद्या बालन यांनी याविषयी आपल्या भूमिका मांडल्या. त्यामागोमागच अभिनेत्री टिस्का चोप्रा हिनेही तिचे विचार मांडले.

टिस्काने ट्विट करत त्यातून काही प्रश्न उपस्थित केले. त्याशिवाय एका वक्तव्यामुळेही तिने अनेकांचे लक्ष वेधेलं. ‘कोणा एका व्यक्तीसोबत तुम्हाला हॉटेलच्या खोलीत जाण्याची काय गरज आहे? तुम्ही अशा ठिकाणी गेलात तर अत्याचार होण्याची शक्यता आणखी बळावते’, असे मत मांडणाऱ्या टिस्काने ट्विटच्या माध्यमातूनही आपले विचार स्पष्ट केले. या ट्विटमधून तिने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीसोबतच पीडित व्यक्तीबद्लही काही प्रश्न उपस्थित केले .

या ट्विटनंतर अनेकांनीच नाराजीचा सूर आळवत टिस्कावरच प्रश्नांचा भडीमार केला. महिलांसाठी सुरक्षित जागा आहेच कुठे? ऑफिस, घर, कार प्रत्येक ठिकाणी धोका आहे, प्रत्येक ठिकाणी लैंगिक शोषण होण्याची शक्यता आहे, असे एका युजरने लिहिले. तर, तू हे सर्व प्रसिद्धीसाठी तर करत नाहीस ना? असा प्रश्नही एका युजरने उपस्थित केला. काहींनी तर चित्रपट निर्मात्यांच्या नजरेत राहण्यासाठी टिस्का हे सर्व करते आहे, जेणेकरुन तिला चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळत राहतील असेही म्हटले. त्यामुळे हॉलिवूडमधून सुरु झालेल्या हार्वी विनस्टिन लैंगिक अत्याचाराला नवे वळण मिळाले आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा