लोकांना त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी धमकावले जाते हे खूप भयानक आणि दुःखदही आहे. असे सांगत बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या निर्णयाचे समर्थन केले. अदितीने ट्विटवरुन दिलेल्या प्रतिक्रियेला काही नेटीझन्सनी विरोध केला आहे. एका नेटीझन्सने तिला पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात शहिद होणाऱ्या जवानांचे आणि त्या्ंच्या कुटूंबियांचे काय? असा सवाल केला आहे. तर एका ट्विटरकराने एक व्यक्ती पाकिस्तानच्या कलाकारांची बाजू घेत असताना संपूर्ण देशाने त्याच्याविरोधात भूमिका घेणे खरचं भयानक असल्याचे म्हटले आहे.

उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र नव निर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना घरवापसी करण्यास भाग पाडले होते. एवढ्यावर न थांबता पाकिस्तानी कलाकार असणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही आक्षेप घेत आपला आक्रमकपणा दाखविला.मनसेच्या भूमिकेनंतर पाकिस्तानी अभिनेत्यासह करण जोहरने चित्रित केलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचे प्रदर्शन वादाच्या भोवऱ्यात सापडले. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामध्ये फवाद खानच्या भूमिकेवरुन वादंग निर्माण झाले आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे हा चित्रपट २८ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘करण जोहरच्या चित्रपटात प्रेमाला एका वेगळ्या रुपात आणि अनोख्या अंदाजात दाखवले जाते. येत्या २८ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता त्याच्या प्रदर्शनावर टांगती तलवार कायम असल्याचेच चित्र आहे.

दरम्यान मंगळवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून करण जोहर याने चित्रपटाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानमुळे ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे येत असतानाच अखेर करण जोहरने या वादावर मौन सोडले आहे. माझ्यासाठी देश महत्त्वाचा असून मी सैन्याच्या जवानांना सलाम करतो. यापुढे मी शेजारी राष्ट्रातील कलाकारांसोबत काम करणार नाही असे स्पष्टीकरण करण जोहरने दिले. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये करणने पाकिस्तान असा उल्लेख न करता शेजारील राष्ट्र असा उल्लेख केला आहे. त्याच्या या भूमिकेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.