अल्पावधीतच मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्माचं नाव आवर्जून घेतलं जातं. कोणत्याही गॉडफादरशिवाय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणं आणि टिकणं अवघड असतं असं म्हटलं जातं. बऱ्याच अंशी ते खरंही आहे. मात्र याला अपवाद ठरत अनेक अभिनेते आणि अभिनेत्री बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अनुष्का शर्मा. पण हे यश तिला सहजासहजी मिळालं असंही नाही. सुरुवातीला तिलाही नकाराला सामोरं जावं लागलं होतं.

२००८ साली ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र ऑडिशनमध्येच आदित्य चोप्राने तिला नाकारलं होतं. ‘नायिका होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते तुझ्यात नाहीत,’ असं म्हणत आदित्यने तिला नकार दिला होता. त्यानंतर शाहरुख खानने तिला भूमिका मिळावी यासाठी प्रयत्न केले. आदित्यला समजावण्यात शाहरुखला अखेर यश मिळालं आणि ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात नायिकेसाठी तिच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

वाचा : तिहेरी तलाक प्रकरणी सलमा आगा यांची मोदींवर स्तुतीसुमने

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती दर्शवली. त्यानंतर अनुष्काचं आयुष्यच बदललं. तिच्यासोबत चित्रपट निर्मितीसाठी दिग्दर्शक वाट पाहू लागले. मात्र यशराजने तिच्यासोबत तीन चित्रपटांचा करार केला होता. ज्यापैकी ‘बदमाश कंपनी’ हा चित्रपट सोडल्यास इतर दोन बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आदित्य चोप्राला ‘रब ने बना दी जोडी’मध्ये शाहरुखसोबत मनिषा कोइरालाला कास्ट करायचं होतं. अनुष्कानेही मिळालेल्या संधीचं सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय पाच अभिनेत्रींमध्ये अनुष्काचं नाव आवर्जून घेतलं जातं. शाहरुख, सलमान आणि आमिर खानसोबत भूमिका साकारण्याची संधी खूप कमी अभिनेत्रींना मिळते. बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत अनुष्का शर्माने भूमिका साकारली.