अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हृतिक- कंगनाचा वाद आता सर्वश्रुत आहे. कंगनाने ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हृतिक रोशनवर केलेल्या आरोपांनंतर बऱ्याच दिवसांनी हृतिकने या विषयावरील मौन सोडले. वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्याने त्याची बाजू मांडली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही त्याला साथ दिली. कंगनाने तिच्या मुलाखतीत पूर्वाश्रमीचा प्रियकर आदित्य पांचोलीवरही शोषणाचा आरोप केला होता. याविरोधात आदित्य आणि त्याची पत्नी झरीना वहाबने मिळून तिला मानहानीची नोटीस पाठवली होती. या नोटिशीला कंगनाच्या वकीलाने उत्तरही दिले होते. मात्र त्या उत्तराने समाधान न झाल्याने आता कंगनाविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याच्या सूचना आदित्यने त्याच्या वकिलांना दिल्या आहेत.

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी नोटिशीला उत्तर दिले होते. २००७ पासूनच कंगनाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये तिच्या वैयक्तिक अनुभवांविषयी बेधडकपणे वक्तव्ये केली आहेत, हे स्पष्ट करत वृत्तपत्राची काही कात्रणेही जोडली होती. या उत्तराने समाधान न झालेल्या आदित्यने ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘माझ्या नोटिशीला हे काही उत्तर नाही. राष्ट्रीय वाहिनीवर मला बदनाम करण्याचा अधिकार कंगनाला नाही.’ तिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय आदित्यने घेतला आहे. त्यामुळे आता कंगनाच्या अडचणीत आणखी वाढ होणार हे नक्की.

वाचा : अनुष्काच्या क्लोथिंग ब्रँडने चायनीज वेबसाइटवरून डिझाइन्स केले कॉपी?

रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आदित्यवर गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडमधील स्ट्रगलिंगच्या काळात कंगना त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आदित्यने मला घरात डांबून ठेवून माझे शोषण केले असा आरोप तिने यावेळी केला होता.