‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने दिलेल्या मुलाखतीनंतर बी-टाऊनमध्ये बरीच चर्चा झाली. या मुलाखतीत हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन यांच्याबद्दल तिने केलेले खुलासे अनेकांनाच थक्क करणारे होते. कंगनाने केलेले आरोप फेटाळत आता तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आदित्य पांचोली आणि त्याची पत्नी झरीना वहाब यांनी तिला मानहानीची नोटीस पाठवली आहे.

स्पीड पोस्टद्वारे आदित्यने कंगनाला मानहानीची नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘कायदेशीर नोटीस पाठवण्याची योग्य प्रक्रिया हीच असून त्याप्रमाणे मी तिला नोटीस पाठवली आहे. मला जे करायचं होतं ते मी केलं आहे. आता पुढे काय करायचं, हे कंगनानं ठरवावं.’ इतकंच नव्हे तर त्याने या प्रकरणात जमीर खान आणि श्रेया श्रीवास्तव या दोन वकीलांचीही नियुक्ती केली आहे.

वाचा : …म्हणून अक्षयच्या चाहत्यांची होणार निराशा

रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आदित्यवर गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडमधील स्ट्रगलिंगच्या काळात कंगना त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आदित्यनं मला घरात डांबून ठेवून माझं शोषण केल्याचा आरोप तिनं यावेळी केला. या आरोपांवर ‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की, ‘ती वेडी झालीये? तुम्ही तिची मुलाखत पाहिली का? एखादा वेडा माणूस बोलतोय असं तुम्हाला वाटलं नाही का?’ इतकंच नाही तर कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्याने दिला होता. आता कंगना यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.