अर्ध्यापेक्षा जास्त बॉलिवूड सिनेसृष्टी सध्या करण जोहरच्या ऐ दिल मुश्किल सिनेमाच्या समर्थनासाठी उभी आहे. बॉलिवूडशी निगडीत लोकांच्यामते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) होणाऱ्या विरोधाला काहीही अर्थ नाही. आता दिग्गज कलाकार नसिरुद्दीन शाह यांनीही एका कार्यक्रमात मनसेला चांगलेच सुनावले. सिनेसृष्टीला कोणीही सोपे लक्ष समजत आहे, असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले.

शहा नेहमीच जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. मग तो मुद्दा कितीही वादग्रस्त का असेना, त्यावर आपले मत मांडताना ते कोणतीही भिड बाळगत नाही. यामुळेच पाकिस्तानी कलाकारांना होत असलेल्या विरोधावर जेव्हा ते मनसेवर टीका केली तेव्हा कोणाला आश्चर्य वाटले नाही. एका पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यात ते गेले असता माध्यमांनी त्यांना ऐ दिल है.. वर सुरु असलेल्या वादावर काही प्रश्न विचारले. यावर त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.

नसीरुद्दीन म्हणाले की, ‘सिनेसृष्टीही कोणालाही सोपे लक्ष वाटते. त्यांना (मनसे) जसे बॉलिवूडचे सिनेमे बघताना मजा येते तसाच आनंद त्यांना सिनेसृष्टीला लक्ष बनवण्यातही येतो. पाकिस्तानसोबत आपण कोणतेही राजकीय संबंध तोडले नाहीत. आपण पाकिस्तानसोबत युद्धाच्या परिस्थितीतही नाही आहोत आणि आपण आपल्या सीमा रेषाही सील केलेल्या नाहीत. आपण फक्त त्या पाकिस्तानी कलाकारांवर निर्बंध घालत आहोत जे प्रेम आणि शांती यांचा संदेश त्यांच्या कामातून देत आहेत.’

नुकतेच मल्टीप्लेक्सच्या मालकांना मनसेने ऐ दिल.. सिनेमा प्रदर्शित केला तर तोडफोड करु अशी धमकी दिली होती. त्यावर नसिरुद्दीन म्हणाले की, ‘मला वाटतं की या मोठ्या मनाच्या लोकांना (मनसे) ज्यांनी निर्माते आणि चित्रपटगृहांच्या मालकांना धमकावले आहे त्यांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढले पाहीजे. पाकिस्तानमधून येणाऱ्या घुसखोरांना मारले पाहिजे तेव्हा कुठे चांगले परिणाम तरी दिसून येतील. बिचाऱ्या कलाकारांना धमक्या देऊन काय मिळणार आहे?’

नसिरुद्दीन यांनी सांगितले की ते हा सिनेमा नक्की पाहतील. ज्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने संमती दिली आहे. तो सिनेमा प्रदर्शित का होऊ नये? त्याच्या प्रदर्शनामध्ये एवढे अडथळे का येत आहेत? मी करण जोहरचा काही फार मोठा चाहता नाहीए. पण तरीही हा सिनेमा मी नक्की बघणार. मला वाटतं की जी व्यक्ती आपल्या कामातून काही तरी दाखवू इच्छिते अशा सर्जनशील व्यक्तिचे समर्थन केले पाहिजे. हा सिनेमा प्रदर्शित करण्यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही असे सरकारनेही आश्वासन दिले आहे.

दरम्यान, पण आता मनसेने या सिनेमाला प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने वर्षा बंगल्यावर दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माता असोसिएनशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज यांनी पाक कलाकार असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रायश्चित म्हणून भारतीय सैन्याच्या कल्याणकारी निधीसाठी (आर्मी वेल्फेअर फंड) प्रत्येकी पाच कोटी रूपये देण्यास सांगितले. ही सूट केवळ चित्रीकरण अंतिम टप्प्यात असलेल्या चित्रपटांसाठी असेल, असे राज यांनी स्पष्ट केले.