नृत्यदिग्दर्शिका फराह खान हिने दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ऐ दिल है मुश्किल या सिनेमाबाबत चालणाऱ्या वादावर आता आपली प्रतिक्रिया दिली. आहे. फराह म्हणाली की, करण असं कधीच काही करणार नाही जे देशाच्या विरोधात जाणारं असेल. फराहची ही प्रतिक्रिया करणने त्याची बाजू मांडणाऱ्या व्हिडिओनंतर दिली आहे. करणने मंगळवारी हा सिनेमा प्रदर्शित व्हावा अशी मागणी करणारा एक व्हिडिओ शूट केला होता. यात त्याने देश हा कोणत्याही गोष्टींपेक्षा मोठाच आहे असे म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांमध्ये जर अशीच स्थिती राहिली तर तो भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराबरोबर काम करणार नाही असेही तो यावेळी म्हणाला. करणच्या या प्रतिक्रियेनंतर फराह म्हणाली की, त्याला जे वाटतं तो तेच बोलला आहे. फराहला जेव्हा सध्या सुरु असलेल्या या वादाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की, काल आम्ही एकत्र शूटिंग करत होतो. करण माझा खूप चांगला मित्र आहे. मला माहितीए तो खूप दुःखी आहे आणि त्याने तेच सांगितले जे त्याला वाटते.
फराह पुढे म्हणाली की, जे देशाच्या हिताचं नसेल असे करण कधीच काही करणार नाही. आता त्याचे स्पष्टीकरणही आले आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आता या गोष्टीवरही पडदा टाकला पाहिजे.
हॅप्पी न्यू इयरच्या या दिग्दर्शिकेने स्वतःची नृत्य शाळा सुरु केली आहे. बुधवारी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवल्यानंतर तिने माध्यमांशीही चर्चा केली.४२ वर्षीय फराह गोविंदाला बॉलिवूडमधला सर्वोत्कृष्ट डान्सर मानते. जेव्हा जेव्हा गोविंदा नाचत असतो त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं असं तिला वाटतं.
आपल्या या नृत्य शाळेबद्दल बोलताना ती म्हणाली की, माझ्याकडे नृत्य दिग्दर्शनाचा २५ वर्षांचा अनूभव आहे. मी या १२ आठवड्यांच्या या प्रशिक्षणामध्ये मी विद्यार्थ्यांना स्वतः शिकवणार आहे. माझ्यावेळी असे प्रशिक्षण देणारे कोणतीही कार्यशाळा नव्हती. यामुळेच नृत्य दिग्दर्शक बनायला मला एवढा वेळ लागला. तिच्या मते आपल्याकडे अनेकजण छान नृत्य करु शकतात. पण, त्यांना तांत्रिक गोष्टी शिकण्याची गरज आहे. या कार्यशाळेचा त्यांना नक्कीच फायदा होईल.