‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता करण जोहर यांच्या वादग्रस्त चित्रपट पाहण्यासाठी किती चाहते चित्रपट गृहात येतील याबाबत चित्रपट वर्तुळात सध्या चर्चा रंगताना दिसत आहे. नेटीझन्सच्या ट्विटरवरुन मिळाणाऱ्या प्रतिक्रियेमुळे चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला असला तरी प्रेक्षकांच्यात चित्रपट पाहण्याची मानसिकता नसल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खानमुळे काही नेटीझन्स अद्यापही चित्रपटाच्या विरोधात कायम आहेत. फवाद खानच्या भूमिकेमुळे चित्रपटाला न जाण्याचा संकल्प काहींनी केला आहे. प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली तर करणला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. करणने या चित्रपटामध्ये केलेली गुंतवणूक लक्षात घेऊन अकोल्यातील एका व्यावसायिकाने करण जोहर याच्या नावाने ३२० रुपयाचा धनादेश पाठवून चित्रपटाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

चित्रपटाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कलेचे नुकसान होऊ नये, तसेच करणचे आर्थिक नुकसान कमी करण्याच्या हेतून करण के चिन्मा या व्यावसायिकाने एचडीएफसी बँकेचा धनादेश करण जोहरच्या नावाने पाठविला आहे. त्यासोबत त्याने एक पत्रही लिहले आहे. ज्यामध्ये एक तिकिट साधारण १६० प्रमाणे दोन तिकिटांचे ३२० रुपये याप्रमाणे धनादेश पाठविला असल्याचा उल्लेख या व्यावसायिकाने केला. त्याने पाठविलेला धनादेश आणि लेटर संदर्भात कोणतीही अधिकृत शहानिशा लोकसत्ताकडून करण्यात आलेली नाही. मात्र व्यावसायिकाच्या पाठवलेल्या धनादेशासंदर्भातील वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या चित्रपटात पाक कलावंतांच्या भूमिका असल्याने मनसेने त्याला विरोध केला होता. मात्र राज्याचे मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे.