‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत होती. या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या राजकीय गरमागरमीमुळे आणि चित्रपटातील स्टारकास्टमुळे नक्की कोणती ‘मुश्किल’ या चित्रपटात दाखवली आहे हे आता प्रेक्षक चित्रपटगृहात पाहतीलच. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये मैत्री, प्रेम, प्रेमभंग आणि त्यातून बदलत जाणारी नात्यांची समीकरणं सांगणारे कथानक चित्रित करण्यात आले आहे.

या चित्रपटामध्ये रणबीर, ऐश्वर्या यांची सिझलिंग केमिस्ट्री सुद्धा पाहण्याची संधी मिळत आहे. संगीतकार प्रितमने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी आणि या चित्रपटाच्या ट्रेलरने याआधीच प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. या चित्रपटाचे शीर्षकगीत ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘बुल्लेया’, ‘चन्ना मेरेया’, ‘क्युटीपाय’ आणि ‘ब्रेकअप साँग’ या गाण्यांची प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये वरचे स्थान मिळवले आहे असे म्हणायला हरकत नाही. करण जोहरच्या या चित्रपटामध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिकांसाठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध चेहऱ्यांची निवड केली आहेच. पण, या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, शाहरुख खान आणि लिसा हेडन या कलाकारांचे कॅमिओही पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने करणचा हा चित्रपट मल्टीस्टारर ठरत आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये असणारे कुतूहल आणि तिकीट खिडक्यांवर अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल करत एकच कल्ला करणारा हा चित्रपट नक्की आहे तरी कसा हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा रिव्ह्यू.