मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने वर्षा बंगल्यावर दिग्दर्शक करण जोहर आणि प्रोड्युसर्स असोसिएनशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज यांनी पाक कलाकार असलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रायश्चित म्हणून भारतीय सैन्याच्या कल्याणकारी निधीसाठी (आर्मी वेल्फेअर फंड) प्रत्येकी पाच कोटी रूपये देण्यास सांगितले. हा निर्णय केवळ चित्रीकरण अंतिम टप्प्यात असलेल्या चित्रपटांसाठी असेल, असे राज यांनी स्पष्ट केले. या सर्व निर्णयांनंतर करण जोहरने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. मात्र अभिनेत्री शबाना आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे.

‘गृहमंत्र्यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला सुरक्षा दिल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी ५ कोटींचा सौदा करत देशभक्ती विकत घेतली आहे’, अशा आशयाचे ट्विट शबाना आझमी यांनी केले आहे. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येत होती. त्यानंतर फवाद खानची भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटालाही विरोध करण्यात येत होता.

शबाना आझमी यांनी ट्विटरद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ‘आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का?’, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरक्षा दिली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीवर शबाना आझमी यांनी निराशा व्यक्त केली. शबाना आझमी यांच्या या ट्विट्समुळे त्या चित्रपट वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.