दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली सध्या त्याच्या आगामी ‘बाहुबली द कनक्ल्यूजन’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या कामात व्यस्त आहे. हा चित्रपट या वर्षी २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता आहे. लेखक आनंद नीलकंठनने तर बाहुबलीच्या कथेपासून प्रेरित होऊन प्रिक्वलच्या रुपात एक पुस्तकच लिहले असून त्याचे नाव ‘द राइज सिवगामी देवी’ असे ठेवले आहे. याच्या मुखपृष्ठाचे शुक्रवारी जयपूर लिटरेचर फेस्टीवलमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. ‘बाहुबली द बिगनिंग’ या चित्रपटात माहिष्मती साम्राज्याची धुरा ही राणी सिवगामी देवी हिच्या हातात होती, हे तर तुमच्या लक्षात असेलच. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, ‘बाहुबली २’ नंतर दिग्दर्शक राजामौली हा ‘महाभारता’ची कथा भव्य स्वरुपात रुपेरी पडद्यावर आणण्याचा विचार करत आहे. यासाठी त्याने तयारी करण्यासही सुरुवात केल्याचे समजते.

६०० कोटींचा महाबजेट
नवभारत टाइम्स या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, राजामौली पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे कळते. हा चित्रपट ६०० कोटी रुपये इतक्या महाबजेटमध्ये बनणार असून यात कलाकारांच्या मानधनाचा आकडा समाविष्ट करण्यात आलेला नाही. कलाकारांच्या मानधनाचा आकडा यात समाविष्ट केल्यानंतर चित्रपटाच्या बजेटचा आकडा याहूनही जास्त वाढणार आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात भव्य चित्रपट असेल. तसेच चित्रपट तयार करण्याकरिता जवळपास ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो असे म्हटले जातेय. कारण, ‘बाहुबली’प्रमाणे हा चित्रपटदेखील दोन भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. याच कारणामुळे राजामौली अशा कलाकारांच्या शोधात आहेत जे चित्रपटासाठी वेळ देऊ शकतील.

राजामौलीचे दिग्दर्शन असलेले ‘बाहुबली’ सिरीज हे हिंदीत डब होऊन बॉलीवूडमध्ये प्रदर्शित करण्यात आले. पण, ‘महाभारत’ हा राजमौलीचा असा प्रोजेक्ट असेल ज्याचे तमिल, तेलगू तसेच हिंदीत चित्रीकरण करण्यात येईल. नवभारतने दिलेल्या माहितीनुसार, राजमौलीच्या ‘महाभारत’मध्ये अर्जुनाची भूमिका त्याचा आवडता कलाकार प्रभासच साकारणार आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रभासने ‘बाहुबली’ चित्रपटाकरिता चार वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. तसेच, त्याने या चित्रपटाकरिता बरीच मेहनतही घेतली. यादरम्यान, प्रभासने अनेक चित्रपटांचे काम नाकारले. त्याच्या या समर्पणामुळे राजामौली प्रभावित झाला असून त्याला कोणत्याही परिस्थितील चित्रपटात घेण्याचा निर्णय त्याने घेतल्याचे कळते.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याने एका मुलाखतीत म्हटले की, जर राजामौलीने महाभारतावर चित्रपट बनवला तर मला त्यात कृष्णाची भूमिका साकारायला आवडेल. आपल्या चित्रपटांसाठी आमिर किती समर्पित होऊन काम करतो ते राजामौलीला चांगलेच माहित आहे. त्यामुळे भारतातील प्रेक्षकांमध्ये आमिरची प्रसिद्धी पाहता राजामौली कृष्णाच्या भूमिकेसाठी त्यालाच घेऊ शकतो.