करण के. या कलाकाराने तब्बल ४८ तासांच्या मेहनतीनंतर साकारलेली ‘पद्मावती’ची हुबेहूब रांगोळी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काही सेकंदात विस्कटून टाकली. हा सर्व प्रकार अभिनेच्री दीपिका पदुकोणपर्यंत पोहोचला तेव्हा तिने एक ट्विट करत संताप व्यक्त केला. इतकच काय, तर तिने दीपिकाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही मदत मागितली होती. त्यानंतर याविषयीची सूत्रं हलवण्यात आली असून पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या पाजजणांमधील चौघे करणी सेनेशी संबंधित असून, त्यातील एक व्यक्ती विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं वृत्त ‘पिंकविला’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. ‘करणच्या रांगोळीची नासधूस करणं, त्याच्यावर हल्ला करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. कोण आहेत हे लोक? या साऱ्यामागे कोणाचा हात आहे आणि हे सर्व कधी थांबणार? या गोष्टी आपण कधीपर्यंत खपवून घेणार आहोत? कायदा हातात घेऊन एखाद्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला करणं हे आणखी किती दिवस सुरू राहणार? आता हे थांबवण्याची वेळ आली आहे आणि अशा लोकांवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे’, असं ट्विट करत दीपिकाने संताप व्यक्त केला होता.

देशातील तमाम सिनेरसिकांना संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली असताना काही स्थानिक संघटनांनी मात्र या चित्रपटाचा विरोध करणं सुरूच ठेवलं आहे. करणी सेना, जय राजपुताना संघटना या संघटना चित्रपटाला दिवसेंदिवस विविध मार्गांनी विरोध करत आहेत.

वाचा : अंमली पदार्थाचा अल्पवयीन मुलांना विळखा

चित्रपटाच्या सेटवर तोडफोट करण्यापासून ते आता ‘पद्मावती’च्या प्रसिद्धीच्या अनुषंगाने रेखाटण्याच आलेल्या सुरेख रांगोळीची नासधूस करण्यापर्यंतच्या त्यांच्या कृती पाहता आता पाणी डोक्यावरुन गेल्यामुळेच खुद्द दीपिकाने पुढे येत थेट केंद्रिय मंत्र्यांकडेच मदतीसाठी धाव घेतली आहे. त्यामुळे चित्रपटांना समाजकंटकांकडून होणारा विरोध, त्यातील राजकारण आणि कलाकारांच्या कलेची होणारी हेळसांड आतातरी थांबणार का, हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.