बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा काम करण्याचा उत्साह हा तरुण पिढीलाही लाजवेल असा आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात बिग बी काहीना काही नवे करताना दिसतात. ‘पिकू’ चित्रपटात त्यांनी सायकल चालवली होती. गेल्यावर्षी कुर्ता आणि डोक्यावर टोपी, मोठे पोट अशा लूकमध्ये अमिताभ कोलकाताच्या रस्त्यावरून सायकल चालविताना दिसले होते. असेच काहीसे दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. मात्र, यावेळी सायकलऐवजी ते स्कूटर चालविताना दिसतील.
रिभू दासगुप्ता याच्या आगामी ‘ते3न’  (Te3N) या चित्रपटात अमिताभ काम करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून, तेथील रस्त्यावर स्कूटरला किक मारताना बिग बी दिसले होते. चित्रपटातील एका दृश्याच्या मागणीनुसार, त्यांनी स्कूटर चालविताना शॉट दिला. डोक्यावर हेल्मेट आणि अगदी सामान्य माणसाच्या पेहरावात अमिताभ यावेळी दिसले.
‘ते3न’मध्ये (Te3N) अमिताभ यांच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.