‘दंगल’ चित्रपटाच्या यशानंतर चर्चेत असणारा बॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान काही दिवसांसाठी आपल्या चाहत्यांपासून दूर जाणार आहे. ‘दंगल’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी होणारा कौतुकाचा वर्षाव अद्याप थांबलेला नसताना, आमिरने आपल्या आगामी चित्रपटाची तयारीही सुरु केल्याचे समजते. ‘दंगल’ चित्रपटातील भूमिकेसाठी मेहनत घेतल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत आमिरने खूपच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आपला प्रवास अखंडित ठेवण्यासाठी आमिर प्रयत्नशील आहे.

आमिर खानने नवीन चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी चित्रपटासाठी आमिरला शांतता हवी आहे. यासाठी आमिरने एकांतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी चित्रपटामध्ये लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो अनोळख्या ठिकाणी जाणार असल्याचे कळते. ‘दंगल’च्या यशानंतर आमिर ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन आमिर मेहनत घेणार असल्याची बॉलिवूड वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे. बॉलिवूड वर्तुळात रंगणाऱ्या चर्चेनुसार, हिंद महासागराच्या दक्षिण पूर्व भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार असून याच ठिकाणी उभारलेल्या कॅम्पसमध्ये आमिर चित्रपटासाठी घाम गाळणार असल्याचे कळते.

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘दंगल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धमाल करताना दिसत आहे. आमिरच्या प्रत्येक चित्रपटाची बॉलिवूड वर्तूळात आणि चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. त्यानुसार त्याचा आगामी चित्रपट देखील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य चोप्रा, अभिनयातील दोन हुकुमी एक्के म्हणजे अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना घेऊन ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट बनवत आहेत.

या चित्रपटातून पहिल्यांदाच बिग बी आणि मिस्टर परफेक्शनिस्ट एकत्र काम करणार आहेत. मात्र, या चित्रपटातील अभिनेत्रीवरुन चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या मुद्यावरुन आमिर आणि आदित्य यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा देखील रंगल्या होत्या. आदित्यला या चित्रपटाची अभिनेत्री वाणी कपूर असावी असे वाटत होते. तर आमिरने मात्र आलिया भट्ट हिला पसंती दिली होती. दरम्यान  वाणी कपूर आणि आलिया भट्ट या दोघींच्याही नावाची चर्चा थंडावली आहे. ‘हिरोपंती’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी क्रिती सेनन आमिरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या आगामी ‘राबता’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.