‘डिप्रेशन’ म्हणजेच नैराश्य हा सध्याच्या काळात एक गंभीर आजार बनला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती ही कशाच्या ना कशाच्या मागे पळताना दिसते आहे. या शर्यतीत जर ते कुठे मागे राहिले किंवा अपयश पाहावं लागलं तर ती व्यक्ती नैराश्यात जाते.
यातही बॉलिवूड आणि डिप्रेशनचे जवळचे नाते आहे. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे असले तरी बॉलिवूडमध्ये टिकून राहणे वाटते तितके सोपे नाही. इथल्या स्पर्धेला तोंड देणे सोपे नाही. इथला व्यवहार पचवणे देखील सोपे नाही. त्यामुळेच अनेक बॉलिवूड कलाकार सतत नैराश्याचे शिकार होताना दिसतात. अलीकडच्या काळात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही नैराश्याने ग्रासले होते.

रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. यातून बाहेर यायला तिला बराच वेळ लागला होता हे तिने मान्यही केले. अर्थात वैद्यकीय उपचार आणि कुटुंबाचा पाठिंबा याच्या मदतीने ती यातून बाहेरही पडली. तिच्या या नैराश्याची बरीच चर्चा झाली होती. दीपिकानंतर मध्यंतरी हृतिक रोशनही नैराश्यात असल्याच्या बातम्या आल्या होता. आता आणखी एका अभिनेत्याने नैराश्याचा सामना केला आहे. अभिनेता टायगर श्रॉफ हा सुद्धा डिप्रेशनमधून गेल्याचे उघड झाले आहे.

एका मुलाखतीत टायगरने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मी नैराश्याने त्रासलो होतो. ‘बागी’ने माझ्या करिअरला चांगला वेग दिला होता. मी त्यामुळे आनंदात होतो. माझ्यासारख्या नवख्या मुलाला मिळणाऱ्या या यशापेक्षा दुसरी कोणतीच चांगली गोष्ट नव्हती. पण यानंतर आलेल्या ‘अ फ्लार्इंग जट्ट’ने माझ्या आनंदावर पाणी फेरले. मी या सिनेमासाठी फार मेहनत घेतली होती आणि लोकांना हा सिनेमा जराही आवडला नाही, हे पाहून मला नैराश्य आले होते.

या नैराश्यातून टायगर स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावरच बाहेर आला. ‘मुन्ना मायकल’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली तेव्हाही मी नैराश्यातच होतो. याच स्थितीत मी शूटिंग सुरु ठेवले. चित्रीकरणाचे पहिले सत्र संपल्यावर अचानक मला साक्षात्कार झाला. गमावलेला आत्मविश्वास परत आला आणि हळूहळू मी नैराश्यातून बाहेर येऊ लागलो, असे टायगरने स्पष्ट केले.