बॉलिवूडची बँग बँग गर्ल म्हणजेच कतरिना कैफ काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर सक्रिय झाली. सोशल मीडियापासून बरीच वर्षे दूर राहणाऱ्या या अभिनेत्रीला ऑनलाइनचे जग आता भावल्याचे दिसते. कारण, फेसबुकनंतर आता कतरिनाने इन्स्टाग्रामवरही तिचे अकाऊंट सुरु केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच कतरिनाने, ‘मी तुम्हाला येत्या गुरुवारी दुपारी २ वाजता आश्चर्याचा धक्का देणार आहे,’ असे पोस्ट केले होते. यावरून ती इन्टाग्रामवर येणार असल्याचा अंदाजही तिच्या चाहत्यांनी लावला होता. अखेर तसेच झाले.

कतरिनाने तिचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबत तिने कॅप्शन लिहिलंय की, ‘नवीन सुरुवात…. हॅलो इन्स्टाग्राम….’ नेटिझन्सनीसुद्धा इन्स्टाग्रामवर तिचे दणक्यात स्वागत केले आहे. आतापर्यंत ३ लाख ८१ हजार लोकांनी तिला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, तिच्या पहिल्याच फोटोला सव्वा लाखापेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत.

कतरिना आगामी ‘जग्गा जासूस’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन चित्रपटांमध्ये झळकणार आहे. अनुराग बासूने ‘जग्गा जासूस’चे दिग्दर्शन केले असून, तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. ‘एक था टायगर’चा सिक्वल असलेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात ती सलमान खानसोबत काम करत आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे.