नव्या पिढीसाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनोखे उपक्रम राबवणाऱ्या कलाकारांमध्ये मराठी अभिनेता मिलिंद शिंदे आणि साऊंड डिझायनिंग आर्टिस्ट कामोद खराडे यांच्याही नावांचा समावेश होतो. ‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोशिएशन’ या संस्थेशी संलग्न असणाऱ्या या कलाकार मंडळींनी गेली १६ वर्षे त्यांचं हे काम सुरु ठेवलं आहे. कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा राबवत या कलाकार मंडळींनी काही साथीदारांच्या मदतीने एक नवी पिढीच घडवली आहे जणू. या सर्व प्रवासाबद्दल मिलिंद शिंदे आणि कामोद खराडे यांनी त्यांचा आतापर्यंतचा अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना शेअर केला आहे.

‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोशिएशन हे आम्हा सर्व मित्रांचच आहे. १९९५ नंतर आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झालो. विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयात त्यांना कलेच्या वेगळ्या संधी उपलब्ध करुन देणं हा यामागचा उद्देश होता. मुख्य म्हणजे शालेय जीवनातील आयुष्यातच कलाकार घडत असतो. कलेविषयी आवश्यक असणारा ठेहरावच या वयात येतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेत आणि कलेप्रती असणारी बांधिलकी जाणत आम्ही या प्रकारचे उपक्रम राबवतो’, असं मिलिंद शिंदे म्हणाले. या स्पर्धांमध्ये प्रसिद्धी आणि जाहिरातीकरणाला जास्त महत्त्व न देता आम्ही कलेला जास्त महत्त्व दिलं. आज या उपक्रमांच्या माध्यमातून बरेच कलाकार आणि स्पर्धक त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत, याविषयीचा आनंदही शिंदे यांनी व्यक्त केला. त्यासोबतच या संस्थेचं अध्यक्षपद भुषविणाऱ्या शिंदे यांनी संस्थेच्या यशाचं श्रेय सर्वांनाच देत आपण या संस्थेचे अध्यक्ष नसून त्यासाठी काम करणारा प्रत्येक जण अध्यक्षपदी आहे हे न विसरता सांगितलं.

त्यांच्यासोबतच कामोद खराडे यांनीही ‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोशिएशन’सोबत जोडलं गेल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला दर्जाहिन गोष्टींचा भडिमार आपल्या नव्या पिढीवर होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दर्जाहिन गोष्टींनी पिढी पुढे नेण्यापेक्षा मुलांनी काहीतरी चांगलं शिकावं यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करत आहोत असं खराडे म्हणाले. कळत्या वयात अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदाच होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेली अनुभव आणि आठवणींची शिदोरी आमच्या कायम सोबतच राहिल असं म्हणत खराडे यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला.

नव्या जोमाच्या कलाकारांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बरेच कलाकार मंडळी एकत्र आल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. असाच आणखी एक गट अनोख्या मार्गाने नव्या कलाकारांना, देशाच्या नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाले आहे. कोणतीही व्यक्ती त्यांच्या कौशल्याच्या बळावरच नावारुपास येते. हीच बाब ध्यानात घेत ‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोशिएशन’तर्फे राज्यस्तरीय खुल्या स्वलिखित काव्यवाचन स्पर्धेचं १५ आणि १६ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं आहे. त्यासोबतच राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

गेल्या १६ वर्षांपासून ‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोशिएशन’तर्फे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदाच्या या खास सोहळ्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्यासोबतच कामोद खराडे, संतोष बडे, सागर जोशी यांच्यासह इतरही सहकाऱ्यांची त्यांना साथ आहे. विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये विजेत्यांना रोख रक्कमेच्या पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे.
सध्या या स्पर्धांसाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या असून, १२ जुलैपर्यंत कथाकथन स्पर्धेच्या आणि १५ जुलैला काव्यवाचनाच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.