आपल्या वादग्रस्त व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या एआयबीने नोटाबंदीवर व्हिडिओ काढून सरकारची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. नेहमीसारखा सरळ वार न करता एआयबीने यावेळी मात्र शालीतून जोडे मारले आहेत.

निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर सामान्य जनतेचे होणारे हाल आणि त्यावर समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचा दृष्टीकोन काय आहे याबाबत ‘निश्चलनीकरणाची सर्कस’ या व्हिडिओतून एआयबीने भाष्य केले आहे.

एआयबीच्या तन्मय भट्टने देखील या व्हिडिओत काम केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. रांगेत उभे राहताना त्यांचे काय हाल होतात? २००० च्या नोटेची मोड मिळवताना कशी दमछाक होते? या सर्व गोष्टींचे चित्रण या व्हिडिओत करण्यात आले आहे.

कुठलाही वाद असू द्या त्यामध्ये देशसेवा, राष्ट्रभक्ती, त्याग आणि सैनिक हे शब्द आल्याशिवाय काही लोकांचे म्हणणे पूर्ण होत नाही त्यावरही या व्हिडिओमध्ये कोपरखळी मारण्यात आली आहे.

निश्चलनीकरणानंतर प्रत्येकाला दुसऱ्याची परिस्थिती बरी वाटत आहे. स्वतः आपण त्रासात आहोत इतरांचे बरे आहे असे सर्वांना वाटत आहे या गोष्टीचाही परामर्श या व्हिडिओतून घेण्यात आला आहे.

हा व्हिडिओ पाहायला अत्यंत मजेशीर असला तरी सामान्य जनतेचे होणारे हाल दाखविण्यात एआयबीला यश आले असे म्हणता येईल. हा काही दिवसांचा तर प्रश्न आहे म्हणणाऱ्यांसाठी या व्हिडिओत एक नवा ट्विस्ट आहे तो पाहिल्यावरच कळेल. या व्हिडिओवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.