आत्ताच एआयबीने नोटाबंदीवर एक व्हिडिओ रिलीज केला. नोटाबंदीची उडवलेली खिल्ली या व्हिडिओमध्ये असल्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. हे दिसताच एआयबीने काँग्रेसवर तयार केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

काँग्रेस नेते आमचा व्हिडिओ शेअर करीत आहेत. कृपया हे पाहा आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा असे ट्विट एआयबीने केले आहे. २०१४ मध्ये हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचे मतदान संपले होते आणि काँग्रेसची हार निश्चित आहे हे गृहीत धरुन एआयबीने थॅंक्यू काँग्रेस हा व्हिडिओ तयार केला होता.

काँग्रेस गेल्यानंतर आम्हाला किती त्रास होईल, देशात पुन्हा भ्रष्टाचार कोण करेल? राहुल गांधींवर जोक्स मारायला कसे मिळतील? अशी विचारणा या व्हिडिओतून केली आहे. काँग्रेसने गेल्या १० वर्षांमध्ये केलेल्या आणि न केलेल्या कामांची खिल्ली या व्हिडिओतून उडविण्यात आली आहे. राहुल गांधी आणि अर्णब गोस्वामी यांची मुलाखत हा देखील त्या काळात चर्चेचा विषय ठरली होती. तेव्हा यावरही एआयबीने गंमत केली आहे.
जर काँग्रेस सत्तेतून निघून गेली तर आता भ्रष्टाचार कोण करणार, आपल्या नातेवाईकांना कमी किमतीत जमीन कोण पुरविणार असे देखील या व्हिडिओमध्ये उपहासाने म्हटले आहे.

पाच मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये काँग्रेस आणि कॉमेडिअन्सचे नाते कसे अतूट असते हे दाखविण्यात आले आहे. निवडणुकीनंतर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याची चर्चा देखील थांबली होती. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी एआयबीचा नवा व्हिडिओ शेअर केल्यानंतर एआयबीने हा जुना व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर या व्हिडिओची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.