आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या या सोहळ्यात गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सरबजीत’ चित्रपटातील अभिनयाकरिता ऐश्वर्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दिला जातो यामुळे तुमचा नक्कीच गोंधळ उडाला असेल. पण, ऐश्वर्याला देण्यात आलेला पुरस्कार हा तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स’तर्फे देण्यात आला आहे. भारतीय सिनेसृष्टीत योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
ओमंग कुमार दिग्दर्शित आणि रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेल्या ‘सरबजीत’ चित्रपटात ऐश्वर्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पाकिस्तानमधील तुरुंगात असलेल्या आपल्या भावाची परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्या सरबजीतच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौर यांची भूमिका ऐश्वर्याने साकारली होती. ‘या चित्रपटाला मिळालेले यश हे कोणा एकाचे नसून ते संपूर्ण टीमचे असल्याचे’ ऐश्वर्याने चित्रपट प्रदर्शित झाल्यावर म्हटले होते. ‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स’मध्ये ऐश्वर्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत छायाचित्रकारांना पोज देताना दिसली.

unnamed-43

unnamed-65

unnamed-92

unnamed-116

unnamed-125

माजी मिस वर्ल्ड असलेली ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष वेधत आहे. एका मासिकासाठी तिने केलेले कव्हर शूट सध्या चर्चेचा विषय बनलेय. फिल्मफेअरसाठी तिने हे शूट केले असून तिच्या या लूकची तुलना करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मधील लूकशी केली जातेय. दरम्यान, गुरुवारीच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी हे जोडपे आपल्या लेकीसह म्हणजेच आराध्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते.