बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या १६ वर्षांपासून कान महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. ती कधी सिनेमाच्या प्रमोशनसाठी तर कधी सौंदर्य प्रसाधनाच्या ब्रॅण्डसाठी कानमध्ये आवर्जून उपस्थिती लावते. अॅश नेहमीच कानमधील तिच्या पेहरावावरून चर्चेत राहिली आहे. एवढेच काय तर दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रींपेक्षा  कानमधील लूकचीच चर्चा सर्वाधिक होते. गेल्या काही वर्षांपासून अॅश आपल्या मुलीला, आराध्याला घेऊन कान महोत्सवाला उपस्थित राहते.

आराध्याला स्टारडमच्या गोष्टी कितपत कळतात? या प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली की, ‘आराध्याला आता सगळं कळायला लागलंय. आम्ही काय काम करतो याची कल्पना तिला यायला लागली आहे. आराध्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बघून आम्हाला हसू येतं. जेव्हा चाहते माझा फोटो काढायला येतात तेव्हा ती स्वतः आमच्या मधे येऊन फोटो काढण्यासाठी उभी राहते.’ कान महोत्सवासाठी फ्रान्सला जातानाही विमानतळावर आराध्या छायाचित्रकारांना बघून हात हलवत होती आणि फोटोही काढू देत होती.

aishwarya-aaradhya

‘मी जेव्हा आराध्याला कोणाला हात दाखवत होतीस?’ असा प्रश्न विचारला तेव्हा तिने, ‘आई मी त्यांना फोटो काढू नका असं सांगत होते,’ असे उत्तर दिले. या गोष्टींचे मला फार आश्चर्य वाटते.

नुकताच लॉरियल पॅरिसने ऐश्वर्या आणि आराध्याचा एका व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये आराध्या, ऐश्वर्यासोबत कार्यक्रमाला जाताना दिसते. वयाच्या पाचव्या वर्षी ज्या पद्धतीने आराध्या कॅमेऱ्याला सामोरे जाते याचे आश्चर्यच छायाचित्रकारांना वाटत होते. कान महोत्सवात पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी ऐश्वर्या जात असताना आराध्या तिला गाडीत बसून बाय बाय करत होती. यावेळी छायाचित्रकारांची नजर अॅशवर कमी आणि आराध्यावर जास्त होती.

aish-aaradhya