बॉलीवूडची सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्याने नेहमीच भुरळ घालते. काही आठवड्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात या बच्चन बहुची एक वेगळी अशी ग्लॅमरस बाजू पाहावयास मिळाली. तसेच, आता ऐश्वर्या तिच्या आगामी भूमिकांमध्येही काही प्रयोगशील राहत असल्याचे दिसते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिल है हिंदुस्तानी’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये तिला परिक्षकाची भूमिका बजावण्याची ऑफर आल्याचे कळते.

ऐश्वर्याच्या जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिल है हिंदुस्तानी’ या शोमध्ये पाचवी परिक्षक म्हणून तिला विचारणा करण्यात आली आहे. करण जोहर, शेखर रावजियानी, बादशाहा, शालमली खोलगडे या चौघांची आधीच परिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पण, ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीकडून अद्याप परिक्षकाच्या भूमिकेसाठी होकार आलेला नाही. मात्र, या शोचे निर्माते ऐश्वर्याने होकार द्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. इतकेच नव्हे तर करण जोहरही ऐश्वर्याच्या होकारासाठी प्रयत्न करत असल्याचे कळते. जर ऐश्वर्याने होकार दिला तर तिच्या चाहत्यांना लवकरच ती टेलिव्हिजनवर दिसेल.

दरम्यान, या शोसाठी ऑडिशनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे करण आणि बादशाहा हे दोघेही आता स्पर्धकांच्या निवडीच्या कामाला लागले आहेत.