‘अग्नीपथ’, ‘सिंघम’, ‘बोलबच्चन’ असे लागोपाठ हिंदी चित्रपट संगीत करण्यात रममाण झालेली मराठीतील प्रसिध्द संगीतकार जोडी अजय-अतुल जवळजवळ दोन वर्षांनी मराठीत परतली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटासाठी अजय-अतुल यांनी ‘थीम साँग’ तयार के ले असून सोमवारी हे गाणे यूटय़ूबवर प्रदर्शित करण्यात आले.
‘चिकनी चमेली’, ‘देवा श्रीगणेशा’ म्हणत हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या तालावर डोलायला लावणाऱ्या संगीतकार अजय-अतुल जोडीला ‘अग्नीपथ’ नंतर एकापाठोपाठ एक चांगले हिंदी चित्रपट मिळत गेले. त्यामुळे तिथेच रमलेल्या या जोडीने दरम्यानच्या काळात मराठी चित्रपटांसाठी संगीतच दिले नव्हते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ‘भारतीय’ या चित्रपटाला संगीत दिले होते. गेले कित्येक दिवस मराठी चित्रपटसंगीतात काहीतरी वेगळे करायचे आहे, अशी इच्छा बाळगून असणाऱ्या या जोडीने ‘फँ ड्री’च्या निमित्ताने आपले हे स्वप्न पूर्ण केले आहे. ‘फँड्री’ बघितल्यानंतर या चित्रपटाचा छोटा नायक जब्याची कहाणी अजय गोगावले यांना फार भावली. त्याच्या कथेपासून प्रेरित होऊन अजयने स्वत:च एक गीत लिहिले आणि त्याला संगीताचा खास ‘अजय-अतुल’ साज चढवला आहे.
‘फँ ड्री’ आधीच पूर्ण झाला असल्याने अजय-अतुल यांचे ‘थीम साँग’ चित्रपटात समाविष्ट होऊ शकत नाही. पण, हे गाणे आता ‘फँ ड्री’च्या प्रसिध्दीसाठी खास ‘प्रोमो साँग’ म्हणून वापरण्यात येणार असल्याचे निर्मात्यांच्या वतीने सांगण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना ही लोकप्रिय जोडी मराठीत परतली असून दोन वर्षांनी चाहत्यांना त्यांचे मराठी गाणे ऐकायला मिळणार आहे. ‘फँ ड्री’ नंतर रितेश देशमुखच्या ‘लई भारी’ या चित्रपटातही त्यांचे संगीत ऐकायला मिळणार आहे. शिवाय, पुन्हा एकदा धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी ‘शुद्धी’ या हिंदी चित्रपटासाठीही अजय-अतुल जोडी संगीत देणार आहे.