‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ कार्यक्रमात अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीची तिच्या वर्णावरुन खिल्ली उडवण्यात आली होती. या घटनेचा अभिनेता अजय देवगनने निषेध केला आहे. पातळी सोडून केल्या गेलेल्या या विनोदावर अजय देवगनने टीका केली आहे. ‘विनोदाला काहीतरी मर्यादा असायला हवी. मी अद्याप तो कार्यक्रम पाहिलेला नाही. मात्र अनेकदा पातळी सोडून विनोद केले जातात’, असे अजय देवगनने म्हटले आहे.
तनिष्ठा चॅटर्जीच्या मागे खंबीरपणे उभे राहताना अजय देवगनने भारतीयांच्या वर्णभेदी वृत्तीवरदेखील हल्ला चढवला आहे. ‘फक्त रंग गोरा असल्यामुळे एखादी व्यक्ती सुंदर होत नाही. आपल्या देशात फक्त गोरे होण्यासाठी अनेक क्रिम विकल्या जातात. आपली ही मानसिकता बदलायला हवी,’ असे अजय देवगनने म्हटले आहे. ‘भारतात लोक वेटरला इकडे ये म्हणून बोलवतात आणि तेच लोक परदेशात जाताच वेटरला कृपया इथे या, असे म्हणतात’, अशा शब्दांमध्ये अजय देवगनने भारतीय मानसिकतेवर अचूक बोट ठेवले.
भारतीय मानसिकतेमध्येच अनेक समस्या असल्याचे अजय मानतो. ‘आपण आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. या देशातील मुलींमध्ये काहीच त्रुटी नाहीत. त्रुटी इथल्या पुरुषांमध्ये आहेत. पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे’, असे अजय देवगनने म्हटले आहे.
स्माईल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अजय देवगन बोलत होता. यावेळी महिला सशक्तीकरणाविषयी अजय देवगनने आपली मते मांडली. ‘मला मुलगी आहे आणि मुलींसाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. मुलींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे. मला सर्वांकडून थोडा पाठिंबा मिळाला, तर मी काहीतरी करु शकतो’, अशी भावना अजय देवगनने यावेळी व्यक्त केली