‘जो पर्यंत चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तो पर्यंत दादा कोंडकेंना लोक विसरणे शक्यच नाही. एवढे सातत्याने ओळीने रौप्य महोत्सवी चित्रपट द्यायचे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही. मात्र ते त्यांनी त्यांच्या मेहनतीने व कामातून करून दाखवले त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काम करत असताना जीव ओतून त्याच्यामध्ये काम केले पाहिजे व त्यातून प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे’, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, भाऊसाहेब भोईर व शरद मस्के याची निर्मिती असलेला अजित शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मंगळवारी मुंबईत संपन्न झाला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वाचा : VIDEO ट्विंकलच्या विसरभोळेपणामुळे अक्षय चिंतेत!

मी या क्षेत्रापासून थोडा लांबच राहिलो असल्याने आज दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनात पहिल्यांदाच चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि तो ही ‘थापाड्या’ सारखा नावाच्या चित्रपटाला. त्यामुळे, काही लोकांच्या मनात प्रश्न येणे साहजिकच आहे. मात्र गेल्या तीन साडेतीन वर्षापासून आपण सगळेच बघत आहोत की कश्याप्रकारे थापा मारल्या जात असून लोकांना बनवण्याचे काम चालू आहे. कदाचित त्याच्यातूनच भाऊ साहेबांना ‘थापाड्या’ हे नाव सुचले असावे, असे मला वाटते. मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी त्या भूमिकेतून हे बोलत नसून आता सहनशीलतेचा अंत झाला आहे असे मला वाटते. आता फसवाफसवीचे काम चालू असल्याची लोकांना जाणीव झालीय. म्हणूनच या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव समर्पक आहे असा माझा कयास असून, तो कदाचित चुकीचा किंवा बरोबरगही असेल.’ असेही मत अजित पवार यांनी मांडले.

वाचा : ..म्हणून भाऊ कदमचे होतेय कौतुक

निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले, ‘लहान वयामध्ये ज्या कल्पना सुचत असतात त्याला मूर्त स्वरूप येण्यासाठी योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटावी लागते. अजित पवार माझ्या जीवनात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीत नफा नसतानाही मी थापाड्या हा चौथा चित्रपट काढू शकलो. मला बऱ्याच जणांनी विचारले या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव देणे कसे सुचले तेव्हा मी त्यांना सांगितले की, आज काल या नावाला बरे दिवस आल्याने हेच नाव देण्याचे ठरवले.’