देशभक्तिच्या नावावरुन सध्या जे काही राजकारण सुरु आहे त्या संबंधीच्या सर्व वादग्रतस्त चर्चांना काही कलाकारांनी त्यांच्या कृतीतून पूर्णविराम दिला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असणारे तणावग्रस्त वातावरण पाहता सध्या प्रत्येकजण आपली देशभक्ती जाहीर करण्यासाठी पुढे सरसावत आहे. त्यातही सणासुदींच्या दिवसांमध्ये आपल्या कुटुंबांपासून दूर असणाऱ्या सैन्यदलातील जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी सरकारतर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतील काही चेहरे मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. अभिनेता अक्षय कुमार, आमिर खान आणि सलमान खानने त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे #Sandesh2Soldiers या हॅशटॅग अंतर्गत सैनिकांना शुभेच्छा देणारे आणि त्यांचे आभार मानणारे संदेश लिहिले आहेत.

‘फक्त आणि फक्त सैनिकांमुळेच आपण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद घेऊ शकत आहोत. तुम्ही आमचे रक्षण करता. माझ्या सैनिक बांधवांनो तुम्हाला माझ्याकडून आणि संपूर्ण देशाकडून दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा’ असे म्हणत अक्षय कुमारने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यासोबतच खिलाडी कुमारने इतरांनाही सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे आव्हान केले आहे. सलमाननेही त्याच्या फेसबुक पेजवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवत सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच परफेक्शनिस्ट आमिर खाननेसुद्धा त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन सैनिकांना शुभेच्छा देण्याचे आव्हान करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला होणारा विरोध आणि पाकिस्तानी कलाकारांनर घालण्यात आलेल्या बंदीमुळे बॉलिवूडमध्ये कलाकारांचेही दोन गट पडल्याचे अनेकांनीच पाहिले. पण, सैनिकांना शुभेच्छा देण्याच्या या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा बॉलिवूडकर एकवटले आहेत असेच म्हणावे लागेल.

सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात सैन्यातील जवानांविषयी आदर आणखी वाढला आहे. गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी नवी संकल्पना मांडली होती. यात जनतेने जवानांना पत्र किंवा मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन केले आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदींनी चार मिनीटांचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओत चिमूरड्यापासून ते तरुण आणि महिलांपर्यंत सर्व जण जवांना पत्र किंवा मेसेज करत असल्याचे दाखविले आहे. यातील निवडक संदेश हे नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातही वाचून दाखवतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही या संदर्भातील विशेष कार्यक्रम असतील. नरेंद्र मोदी अॅप, MyGoV अॅप आणि रेडिओच्या माध्यमातूनही जवानांना संदेश पाठवणे शक्य होणार आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता जेव्हा सैन्यातील जवानांच्या पाठिशी उभी राहते तेव्हा त्या जवानांची ताकद सव्वाशे कोटींनी वाढते असेही मोदींनी म्हटले आहे.