कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव उपक्रमाअंतर्गत १०३ शहिदांच्या कुटुंबीयांची दिवाळी प्रकाशमान करण्यात आली. २४ तास ऑन ड्युडी असणारे पोलीस आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी शहिदांच्या कुटुंबांना मदत केली.

वाचा : सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप

आपल्या देशाचे रक्षण करत असताना ज्यांनी आपला पुत्र, पती किंवा पिता गमावला, अशा कोल्हापूर परीक्षेत्रातील शहिदांच्या कुटुंबीयांची यादी करण्याच्या सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार १०३ शहिदांच्या नावांची यादी तयार करण्यात आलेली. या सर्व शहिदांच्या घरामध्ये यंदा दिवाळीला मिठाई घेऊन जाण्याचे त्यांनी ठरवले. या अभिनव उपक्रमाबद्दल अभिनेता अक्षय कुमारला समजताच त्यानेही मदत करण्याची इच्छा दर्शवली.

वाचा : BLOG एसटी व मनोरंजन उद्योगाचे नाते खूपच जुने व मजबूत..

शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे सरसावणाऱ्या अक्षयने २५ हजार रुपयांचे १०३ धनादेश तयार करुन त्यासोबत एक सदिच्छा पत्र जोडले. या पत्रात त्याने लिहिलंय की, ‘आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सानिध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र, यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई आणि त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती.’ या पत्राच्या शेवटी अक्षयने स्वाक्षरी केली आहे.