बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या दानशूर स्वभावाने सर्वांना चांगलाच परिचित आहे. त्याचा दानशूरपणाची आणखी एक प्रचिती नुकतीच आली. आपल्या सहकारी मित्रांच्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांची मने जिंकणाऱ्या अक्षयने त्याच्या आणखी एक दोस्ताना दाखवून दिला. काही आठवड्यापूर्वी अक्षय कुमारच्या सांगण्यावरुन बॉलिवूडचा आघाडीचा कलाकार रणवीर सिंगने सुरतमधील एका स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेतील गोंधळामध्ये रणवीरने आपल्या पसंतीचा गॉगल गहाळ झाला. ‘बेफिक्रे’ चा हा कलाकार आपली वेशभूषा आणि स्टायलिश लूकवर चांगलेच लक्ष देऊन असतो. स्पर्धेमध्ये घडलेल्या प्रकार रणवीर विसरला असला तरी अक्षय कुमार हा प्रकार विसरला नव्हता. अक्षयने आपल्या मित्राला सांगून पॅरिसवरुन रणवीरसाठी खास गॉगल आणण्यास सांगितले.

अक्षय कुमारने रणवीरला गॉगल गिफ्ट देत, त्याचा फॅशन लूकची शोभा वाढविणाऱ्या गहाळ झालेल्या गॉगलची परत फेड गिफ्टच्या स्वरुपात केली. हरवलेला गॉगल उपलब्ध करुन घेण्यासाठी अक्षयने खूप प्रयत्न केले होते. त्याच्या या स्वभावाची पहिल्यांदाच अनुभूती आल्यानंतर रणवीर थक्क झाला. याप्रकारानंतर त्याने अक्षय कुमारचे आभारही मानले. रणवीरचे सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असला तरी, रणवीर हा अक्षयचा चाहता आहे. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्कीच्या कीमत या चित्रपटाच्या सेटवर रणवीर आणि अक्षय यांची भेट झाली होती. ही रणवीरच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट होती.

रणवीरचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरसह वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे चित्रीकरण ५० दिवसांत पॅरिस आणि मुंबई येथे करण्यात आले आहे. ‘बेफिक्रे’ चित्रपटाची कथा पॅरिसमध्ये राहणारा मुलगा धरम (रणवीर) आणि शायरा (वाणी) यांच्याभोवती फिरते. हे दोघेही अनौपचारिक प्रेमसंबंधांमध्ये असतात. यात ते आपण कधीच एकमेकांच्या प्रेमात पडणार असा करार करतात. त्यानंतर नक्की काय होते ते तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

भारतीय सैन्यदलाप्रती असणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार कधीही कचरत नाही. शहीदांच्या कुटुंबांना तर हा खिलाडी कुमार नेहमीच सढळ हाताने मदत करतो. त्यामुळे आपल्या देशाप्रतीची जबाबदारी जाणणाऱ्या या अभिनेत्याबद्दल अनेकांच्या मनात आदर आहे. जम्मू-काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलातील जवानांप्रती अनेकांनी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामध्ये खिलाडी अक्षयचे नाव सर्वाधिकवेळा चर्चेत आले होते.