२३ जानेवारीला असीनचा विवाह ‘मायक्रोमॅक्स’चे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी पार पडणार असून, लग्नाची पहिली पत्रिका असीनचा जवळचा मित्र अक्षय कुमारला देण्यात आलीये.

काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने असीन आणि राहुल यांची ओळख करुन दिली. असीनने तिच्या लग्न पत्रिकेचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, तिने लग्नाची पहिली पत्रिका बेस्ट मॅन म्हणजेच अक्षय कुमारला दिल्याचे म्हटले आहे.
लग्नाची निमंत्रण पत्रिका डोळ्यात भरणारी आहे. तपकिरी आणि सोनेरी पिवळा हे रंग लग्न पत्रिकेच्या डिझाइनसाठी वापरण्यात आले आहेत. असीनने तिच्या व राहुल शर्मा यांच्या संबंधाबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही. अलीकडेच अक्षय म्हणाला होता की, ‘होय, मी (असीन आणि राहुल) यांची ओळख करुन दिली हे खरे असले, तरी मी कोणतीही जोडी जुळवण्याची कंपनी स्थापन केलेली नाही.  आज (१० जानेवारी) रोजी असीन आणि राहुल शर्माने लग्नाचे आमंत्रण दिल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच अक्षय कुमारने निमंत्रण पत्रिका मिळाल्याने आनंद व्यक्त केला.