बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या ‘नाम शबाना’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘बेबी’ चित्रपटाच्या यशानंतर तापसी पन्नू आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू शबाना नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही जोडी सध्या दिल्लीमध्ये आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी तापसीला अॅक्शनचे धडे देणाऱ्या अक्षयला तिच्यासमोरच एका तरुणीने चारी मुंड्या चीत केल्याचे पाहायला मिळाले.

अक्षय नेहमीच तरुणींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यावर भर देताना दिसतो. आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धी वेळीही त्याने दिल्लीतील गार्गी कॉलेजातील तरुणींशी सवाद साधत त्यांना आत्मसंरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण देणाऱ्या गुरुला म्हणजेच अक्षयला एका तरुणीने क्षणार्धात चीतपट करत उपस्थितांची मनं जिंकली. दिल्लीच्या तरुणीकडून पराभूत झालेल्या अक्षयने ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत तिचे कौतुक केले. सर्वच ठिकाणी तरुणी शक्तिमान असल्याचे सांगत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चांगली पसंती मिळत असून, या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत.