चित्रपटांमध्ये अनेकदा जवानाची आणि पोलिसाची भूमिका साकारणा-या अभिनेता अक्षय कुमारने महिलेचे प्राण वाचवणा-या एका पोलीस कॉन्स्टेबलची प्रशंसा केली आहे.
अक्षय कुमारने २१ सेकंदांचे एक क्लिप ट्विटवर शेअर केले आहे. या क्लिपमध्ये, ट्रेनखाली जाणा-या महिलेचे एका पोलीस कॉन्स्टेबलने प्राण कसे वाचवले ते दिसते. सदर महिला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यादरम्यान तिचा तोल गेला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कॉन्स्टबलने लगेच पुढे येऊन त्या महिलेला बाहेर ओढले. यामुळे त्या महिलेचे प्राण अगदी जाताजाता वाचले. या व्हिडिओला अक्षयने कॅप्शनही दिली आहे. त्यात त्याने म्हटले की, हा व्हिडिओ पाहताना माझे प्राण कंठाशी आले होते. लोणावळा पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल पवन तायडे यांच्या समयसूचकतेला आणि कर्तव्यदक्षतेला माझा सलाम. हा ४९ वर्षीय अभिनेता जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पडणा-या पोलिसांच्या चांगल्या कार्याची नेहमीच प्रशंसा करत असतो.
सरकारी अधिका-यांची अक्षयने प्रशंसा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘रुस्तम’ चित्रपटाची हैद्राबादमध्ये प्रसिद्धी करत असताना त्याने आपल्या व्यस्त कामातून एक दिवस काढत ‘सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी’ला भेट दिली होती. तिथे त्याने आयपीएस अधिका-यांशी संवाद साधला. तसेच त्याने सर्वांसोबत फुटबॉल खेळण्याचाही आनंद लुटला. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणा-या जवानांचे आणि अधिका-यांची अक्षय वेळोवेळी प्रशंसा करत असतो.
आपल्या चित्रपटातूनही अक्षयने ब-याचदा कर्तव्यदक्ष सरकारी अधिका-यांची भूमिका साकारली आहे. ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘स्पेशल २६’, ‘गब्बर’ आणि ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने कर्तव्यदक्ष नागरिक आणि दहतवादी तसेच भ्रष्ट लोकांना धडा शिकवणा-या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटावर काम करत आहे. त्यासाठी तो लखनौला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या कामाला बाजूला सारत त्याची लाडकी लेक निताराचा वाढदिवस साजरा केलेला.