बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या मार्शल आर्टच्या कौशल्याबाबत सर्वच परिचित आहेत. नुकतेच अक्षयने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून नव्याने भरती झालेल्या आयपीएस अधिकाऱयांच्या शिबिरात उपस्थिती लावली. यावेळी अक्षय आयपीएस अधिकाऱयांसोबत मार्शल आर्ट देखील खेळला. याचा व्हिडिओ देखील अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्षय सध्या ‘रुस्तम’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हैदराबाद येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. यादरम्यान अक्षयने नव्याने भरती झालेल्या आयपीएस अधिकाऱयांच्या शिबीरात संपूर्ण दिवस व्यतीत केला. मार्शल आर्टसोबतच अक्षयने वॉलीबॉल आणि इतर खेळांमध्येही सहभाग घेतला. अक्षयने मार्शल आर्टचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. अक्षयने इयत्ता आठवीला असतानाच कराटेचे प्रशिक्षण सुरू केले होते. कराटे, मार्शल आर्टसोबतच अक्षय किकबॉक्सिंग, स्विमिंग, वॉलीबॉल हे खेळ देखील उत्तमरीत्या खेळतो.