‘स्पेशल २६’ हा अक्षयकुमार आणि दिग्दर्शक नीरज पांडेचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने अक्षयकुमारला आशयात्मक चित्रपटासाठी कौतुकाची थाप मिळाली आणि तिकीटबारीवर पैसाही मिळाला. त्यानंतर या जोडीचा गेल्या वर्षी आलेला ‘बेबी’ हा चित्रपटही यशस्वी ठरला आणि त्याही चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली. आता तिसऱ्यांदा नीरज पांडेबरोबरचा चित्रपट आपल्यासाठी हीच किमया करेल, अशी आशा बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारला वाटते आहे. अक्षयकुमार आणि नीरज पांडे ही जोडी आगामी ‘रुस्तुम’ या चित्रपटातून एकत्र येणार आहे.
दिग्दर्शक नीरज पांडे हे नाव चित्रपटसृष्टीला आता नवीन राहिलेले नाही. हटके कथानक घेऊन चित्रपट करणारा दिग्दर्शक अशी आता त्याची ओळख झाली आहे. ‘वेनस्डे’ या पहिल्याच चित्रपटानंतर नीरज पांडेने ‘स्पेशल २६’सारखा हिट चित्रपट दिला. अक्षयकुमारबरोबर आता या दिग्दर्शकाची जोडी जमली असली तरी ‘रुस्तुम’चे दिग्दर्शन मात्र टिनू सुरेश देसाई यांचे असणार आहे. ‘रुस्तुम’ची कथा टिनूने ऐकवली तेव्हाच त्या कथेचा आशय हा लोकांना आवडेल, असा विश्वास वाटला. या कथेसाठी अक्षयकुमार एकदम फिट असल्याने त्याला पहिल्यांदा विचारणा केली. त्यानेही कथा ऐकल्यानंतर चित्रपटासाठी होकार दिला असल्याचे नीरज पांडे यांनी सांगितले. नीरज पांडे या चित्रपटासाठी स्वत: पटकथा आणि संवाद लिहिणार असून ‘झी स्टुडिओज’ने चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी उचलली आहे.
‘‘नीरजबरोबर पहिल्या दोन सर्वोत्तम चित्रपटांत मी काम केले आहे. त्यामुळे त्याच्या तिसऱ्या चित्रपटाबद्दलही मला तितकीच उत्सुकता आहे. या कथेची गरज पाहता हा चित्रपट जगभरात पोहोचणे गरजेचे होते जे झी स्टुडिओमुळे शक्य होईल,’’ असे सांगणाऱ्या अक्षयकुमारने आपल्याला नीरजच्या या तिसऱ्या चित्रपटाबरोबर तिकीटबारीवर यशाची हॅट्ट्रिक साधता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नीरज पांडे यांच्या शैलीला अनुसरून ‘रुस्तुम’ची कथाही प्रत्यक्षात घडलेल्या घटनेवर आधारित असून त्याचे चित्रीकरण या वर्षी डिसेंबरअखेरीस सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आधी १२ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.