बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा आगामी सिनेमा टॉयलेट एक प्रेम कथा पुढच्या महिन्यात ११ तारखेला प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघंही दिवस- रात्र प्रमोशन करत आहेत. सध्या अक्षय, भूमी आणि अनुपम खेर तिघंही लंडनमध्ये आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेले होते. पत्रकार परिषदेला जाताना ते एका टॅक्सीमध्ये बसले होते. तेव्हाच अक्षयने फेसबुक लाइव्ह जाण्याचा निर्णय घेतला. १५ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तो सतत भूमीला त्रास देताना दिसत होता.

आपल्या या फेसबुक लाइव्हमध्ये अक्षय म्हणाला की, ‘भूमी खुप बोलते. प्रमोशनमधील अनेक मुलाखतीत तिच बोलताना दिसते. ती मला फार बोलूही देत नाही. एकदा का भूमीला बोलायची संधी मिळाली की ती कोणालाही बोलू देत नाही.’ अक्षयने जेव्हा तिला सिनेमाबद्दल बोलायला सांगितले तेव्हा ती फार मोजकच बोलली आणि अक्षयला बोलायला सांगितले. तिचे हे रुप पाहून आज का कमी बोलतेस असा प्रतिप्रश्न अक्षयने केला.

अक्षयचा हा सिनेमा प्रदर्शनाआधीच विवादांमध्ये अडकला आहे. प्रतिक शर्मा याने कॉपीराइट अॅक्टचे उल्लंघन केल्याची तक्रार नोंदवली होती. प्रतिकच्या ‘गुटरुं गुटर गूं’ या सिनेमातून टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाची पंच लाइन आणि विषय चोरला असल्याचा आरोप त्याने केला होता.

नुकतेच प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाला एका पेन ड्राइव्हमध्ये संपूर्ण सिनेमा सापडला. त्याच्या इमारतीच्या जीम ट्रेनरकडे सापडला होता. त्याने हा पेन ड्राइव्ह सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे दिला असला तरी याचे अजून किती कॉपी बाहेर आल्या असतील याबद्दल कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. स्वच्छ भारत अभियानाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गल्ला कमवणार हे तर येत्या काळात कळेलच.