बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला जेव्हापासून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तेव्हापासून या निर्णयाचा विरोध केला जात होता. या संपूर्ण प्रकरणावर अक्षयने आतापर्यंत मौन बाळगले होते. पण, अखेर अक्षयने त्याच्या विरोधकांना जशास तसे उत्तर दिले.

मुंबईतील स्टंटमॅन असोसिएशनशी निगडीत एका कार्यक्रमात अक्षयने, पुरस्कारावर एवढी चर्चा का होते असा प्रश्न विचारला. याआधीही ज्यांना पुरस्कार मिळाले तेव्हाही अनेक वाद झाले होते. माझ्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण यावरही कोणाला आक्षेप असेल तर हा पुरस्कार परत घ्यावा, असे तो यावेळी म्हणाला. प्रियदर्शन यांच्या ज्युरी टीमने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली होती. यावेळी अक्षयला ‘रुस्तम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असल्याचे जाहीर केले होते.

अक्षयला मिळालेल्या या पुरस्कारावर सोशल मीडियावर खूप टीका झाली. काही लोकांना आमिरला ‘दंगल’ सिनेमासाठी पुरस्कार मिळावा असे वाटत होते. तर काहींना अक्षय, प्रियदर्शनचा खूप चांगला मित्र आहे म्हणून त्याला हा पुरस्कार मिळाला असे वाटले. पुरस्काराची अपेक्षा न करता नेहमीच काही ना काही चांगलं करत राहिलं पाहिजे, असंही अक्षय या कार्यक्रमावेळी म्हणाला. पद्मभूषणसारख्या पुरस्कारांसाठी भरपूर काम करावे लागते. कोणत्याच गोष्टी सहज मिळत नाहीत, असेही त्याने म्हटले.

अक्षय लवकरच स्टंटमॅन आणि स्टंटवूमनसाठी एक जीवन विमा योजना सुरु करणार आहे. यात स्टंटमॅनना सुमारे १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. तसेच स्टंट करताना जर एखाद्या स्टंटमॅन / स्टंटवूमनचा मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्यात येण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे.