‘मदर्स डे’च्या दिवशी आपल्या मुलाने दिलेल्या खास गिफ्टने अभिनेत्री ट्विंकल खन्नाला आनंद झाला आहे. अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा मुलगा आरव देखील कराटेमध्ये नैपुण्य प्राप्त करत आहे. ‘कुडो’चा एक भाग आरवने नुकताच पूर्ण केला असून त्याला फर्स्ट डीग्रीचा ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला आहे. कुडो हा मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. आरवने याच्या पहिल्या भागाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. खुद्द अक्षय कुमार याचा मार्शल आर्टमध्ये हातखंडा आहे, तर कराटे खेळाबाबत तो नेहमी जनजागृती देखील करत असतो. आरवने कुडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवून मला मदर्स डे चे सर्वोत्तम गिफ्ट दिले असल्याचे ट्विट ट्विंकल खन्नाने केले आहे. याशिवाय, आरवच्या हा कामगिरीचा अभिमान असल्याचेही ती म्हणाली. एकूण ९ वर्षांच्या सरावानंतर आरवला ब्लॅक बेल्ट मिळाला आहे.