अक्षय कुमारचे मराठी प्रेम लपून राहिलेले नाही. त्याला मराठीत गप्पा मारायला आवडतात. मराठी भाषा आवडत असली तरी त्या भाषेत मोकळ्या गप्पा मारण्याची संधी त्याला क्वचितच मिळते. तशी संधी त्याला ‘कौल मनाचा’ या मराठी चित्रपटाच्या म्युझिक लाँच निमित्ताने मिळाली. आणि सध्या चित्रिकरणातून क्षणभर विश्रांती मिळाली असल्याने एकदम मजेशीर मूडमध्ये असलेल्या अक्षयने शाळेतून आपल्याला दोन दिवस तडीपार व्हावे लागले होते, याचा किस्सा सांगितला.

शाळेत, महाविद्यालयात सुंदर शिक्षक, शिक्षिकेवर प्रेम करणाऱ्या मुला-मुलींच्या कथा हिंदी-मराठी चित्रपटातून अनेकदा पहायला मिळाल्या आहेत. मात्र शाळेत तसा विचार करणेही अक्कीला महाग पडले होते. आपल्या मित्राला या शिक्षिकेवर माझे प्रेम आहे हे सांगणाऱ्या अक्कीला त्याच शिक्षिकेने पकडले आणि त्याच्या बालसुलभ मनातील हे थोर विचार ऐकून चक्रावलेल्या शिक्षिकेने आणि प्राचार्यानी त्याची दोन दिवस शाळेतून हकालपट्टी केली होती. आज चित्रपटांमधून हेच प्रसंग हसवत असले तरी प्रत्यक्षातही या कलाकारांनी तशाच प्रकारच्या करामती केल्या आहेत हे त्यांच्या तोंडून ऐकण्याचा अनुभवच निराळा.. ‘कौल मनाचा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयच्या गप्पांचा योग जुळून आला होता. या चित्रपटातीललहान मुलांची कथाही अशीच त्यांच्या आवडत्या शिक्षिकेभोवती फिरत असल्याने अक्षयला त्याची ही शाळेतली गंमत आठवली आणि त्याने लगेच ती सगळ्यांना ऐकवली.