श्री नारायण सिंग दिग्दर्शित ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट सध्या प्रदर्शितसाठी सज्ज झाला आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या मार्गात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. खिलाडी कुमारच्या या चित्रपटाची संपूर्ण कॉपी एका व्यक्तीच्या पेन ड्राइव्हमध्ये असल्याचे वृत्त ‘स्पॉटबॉय’ या वेबसाईटने प्रसिद्ध केली होती. ही बातमी खरी असल्याचे कोरिओग्राफर रेमो डिसोझाने स्पष्ट केले.

‘इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉम’शी बोलताना रेमो म्हणाला की, ‘मला एक माणूस भेटला आणि त्याच्या पेन ड्राइव्हमध्ये टॉयलेट : एक प्रेम कथा हा चित्रपट असल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीला मला यावर विश्वास बसला नाही. मात्र तो माणूस गंभीर मनस्थितीत होता आणि मला स्वत:ला त्याने तपासून पाहिण्यास सांगितले. मी जेव्हा तो पेन ड्राइव्ह तपासला तेव्हा त्यात तो चित्रपट होता आणि मला धक्काच बसला. लगेचच मी अक्षय कुमारला फोन लावला. मात्र तो लंडनमध्ये असल्याने त्याचा फोन लागला नाही. त्यानंतर मी निर्माती प्रेरणा अरोराला फोन लावला. त्यांना सगळी हकिकत सांगितली. दिग्दर्शक श्री नारायण सिंग आले आणि त्यांनी तो पेन ड्राइव्ह घेतला. याविरोधात ते कायदेशीर कारवाई करणार असून मी सुद्धा अक्षय भारतात परतल्यावर त्याला हे सगळे सांगणार आहे.’

वाचा : आता बॉक्सिंग टिममध्ये दिसणार ‘बाहुबली’

रेमो डिसूजाच्या जिम ट्रेनरने पेन ड्राइव्हमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट असल्याचे सांगितले होते. जिममध्ये सापडलेल्या एका पेन ड्राइव्हमध्ये तो चित्रपट असल्याचे म्हटले जात होते. सध्याच्या घडीला प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेल्या चित्रपटांमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे नाव अग्रस्थानी आहे. अशा वातावरणात या चित्रपटाच्या लीक होण्यामुळे चित्रपटांच्या टीममध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळतेय.