बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘भारत के वीर’ या जवानांना मदतीचा हात देणाऱ्या सरकारी वेबसाइटला मदत करणाऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले आहेत. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ९ एप्रिलला ‘भारत के वीर’ या वेबसाइट आणि मोबाइल अॅपचे उदघाटन करण्यात आले होते.

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करता यावी यासाठी अक्षयने गृहमंत्रालयाला वेबसाइट आणि अॅप लॉन्च करण्याची कल्पना दिली होती. त्याच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वेबसाइटच्या माध्यमातून सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या कुटुंबियांना देशातील कानाकोपऱ्यातून आर्थिक मदत केली जात आहे. जवानांच्या कुटुंबियांना १२ तासांच्या आत भरभरुन मदत मिळत असल्याचे वृत्त या वेबसाइटने दिले आहे. शहीद हेड कॉन्स्टेबल के. पी. सिंग यांच्या पत्नी आणि आईला ३१ हजार ६१२ रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. एएसआय नरेश कुमार यांच्या कुटुंबियांना २८ हजार ८५१ रुपये तर एएसआय संजय कुमार यांच्या कुटुंबियांना २५ हजार ८२१ रुपयांची मदत मिळाली आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

दरम्यान,चुकीच्या मार्गाने पैसे लाटण्याच्या हेतूने ‘भारत के वीर’च्या नावाखाली सध्या काही बोगस सेवांची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. त्यापासून सावध राहण्याचा इशारा अक्षयने दिला आहे.