अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणाला जर अभिनयाचे धडे मिळाले तर ती व्यक्ती किती आनंदी होईल ना.. बॉलिवूडचे शहेनशहा यांच्याकडून अभिनयातले बारकावे कळणार असतील तर अजून काय हवंच.. असाच काहीसा अनुभव अली फजल घेतोय. ज्या कलाकाराकडे सिनेसृष्टीत काम केल्याचा २०-२५ नाही तर तब्बल ५९ वर्ष काम केल्याचा अनुभव असेल तर त्यांचं अनुभवाचं गाठोडंही तेवढंच भरलेलं असणार, नाही का? अली फजल सध्या जुडी डेंच यांच्यासोबत काही काळ घालवत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अभिनयातले बारकावे शिकायची तो एकही संधी सोडत नाहीए.

अली फजल सध्या एका हॉलिवूड सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. यासाठी तो महिनाभर युरोपमध्ये आहे. या सिनेमात तो जुडी डेंचसोबत काम करत आहे. त्यामुळे तिच्याकडून जेवढे जास्त शिकता येईल तेवढे शिकण्याचा तो प्रयत्न करीत आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी ‘बॉण्ड’ चित्रपटातील ‘एम’ या भूमिकेसाठी जुडी प्रसिद्ध आहे.

ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब यांसारख्या पुरस्कारांवर आपली मोहर उमटवलेल्या जुडीचे मार्गदर्शन घेण्यासाठी अली सेट आणि बाहेरदेखील तिच्यासोबत वेळ घालवत आहे. जुडी म्हणजे अ‍ॅक्टिंगची चालतीबोलती कार्यशाळाच! विशेष म्हणजे या ‘फुकरे’ स्टारचा शिकण्याप्रती उत्साह पाहून तीदेखील प्रभावित झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुडी स्वत:च्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अलीसोबत अनेक विषयांवर चर्चा करत असते. संवाद कसे बोलावे, शब्दांमागाचा अर्थ कसा ओळखावा, व्यक्तिरेखेतील विविध कांगोरे कसे तपासावेत या आणि अशा अनेक गोष्टींवर हे दोघं तासन् तास चर्चा करतात.

स्वतः अलीनेच तिचा आणि त्याचा एक फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. यात तो जुडीला ‘क्वीन’ म्हणजे राणी असे संबोधतो आहे. मी माझ्या राणी आणि आणखीन दोन मित्रांसोबत… असा मेसेज असणारी ही पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.