‘कपूर अॅण्ड सन्स’च्या यशानंतर बॉलीवूडची बबली गर्ल आलिया भट लवकरचं एका नव्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटामध्ये आलिया बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबत झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि आलिया हे रोमान्स करताना दिसणार की नाही याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. मात्र, त्याच्याव्यतिरीक्तही अजून चार अभिनेते या चित्रपटात काम करत आहेत. आणि या चारही अभिनेत्यांसोबत आलिया रोमान्स करताना दिसेल.
मुंबई मिररच्या माहितीनुसार, गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात अली झफर, कुणाल कपूर, आदित्य रॉय आणि अंगद बेदी हे चार अभिनेते झळकणार आहेत. चित्रपटात आलिया फिल्ममेकरच्या भूमिकेत दिसणार असून, ती यात विविध पुरुषांसोबत डेट करताना दिसेल. विविध क्षेत्रातून येणारे आणि वेगवेगळे स्वभाव असलेले हे चौघेजण आलियाच्या आयुष्यात बरेच काही बदल घडवून आणतात, असे चित्रपटाचे कथानक आहेत. नुकताचं आलिया आणि शाहरुखचा चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाला होता.