बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारुपाला येणाऱ्या आलिया भट्टचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा याने आलिया भट्टचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलियाने जो ड्रेस परिधान केला होता, अगदी तसाच ड्रेस परिधान करुन करिना कपूर जब वी मेट या चित्रपटात दिसली होती. आलियाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. लाखोंपेक्षाही अधिक लोकांनी हा फोटो लाइक केला आहे. या फोटोमध्ये आलियाने करिनाची कॉपी का केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण त्याचे कारणही थोडे खास आहे. ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आलिया, करिना कपूर खानच्या गाण्यावर थिरकणार होती. यासाठी तिने करिना कपूरने जब वी मेटमध्ये घातलेल्या ड्रेससारखाच ड्रेस परिधान केला होता. करिनाला आलियाकडून ही एक मानवंदनाच होती. तिचा हा फोटो पाहून आलियाच्या या प्रयत्नाला यश आले असेच म्हणावे लागेल.

बॉलिवूडमध्ये मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले होते. उडता पंजाब या चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला हा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये आलियाने करिना कपूर खान आणि शाहिद कपूर या दोघांसोबतही स्क्रिन शेअर केली होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आलिया शाहिद कपूरचे आभार मानायला विसरली नाही. उडता पंजाब चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी समीक्षकांच्या नजरेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहिद कपूरला पसंती देण्यात आली होती. आलिया कपूरला हा पुरस्कार श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी प्रदान केला. यावेळी आलियाने श्रीदेवी यांच्याकडून पुरस्कार मिळणे अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले होते.

आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सर्वांमध्ये सर्वात जास्त आनंदात आणि उत्साहात होते ते म्हणजे आलियाचे वडील महेश भट्ट. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच्या सकाळी महेश भट्ट यांनी चेहऱ्यावर स्मित असलेल्या, शांतपणे झोपी गेलेल्या आलियाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी आलियाची प्रशंसा करणारे आणि तिला प्रोत्साहित करणारे असे कॅप्शनही लिहिले होते. आलियाला उद्देशून त्यांनी लिहिले होते की, ‘एकदा का तू निडर झालीस की आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी सीमा राहात नाहीत. माझ्या महान पण तितक्याच मोठ्या मुलीचे खूप खूप अभिनंदन.’