बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट तिचा आगामी सिनेमा ‘राझी’च्या चित्रीकरणासाठी काश्मीरमध्ये आहे. पण सिनेमाचे चित्रीकरण सुरळीत सुरू असताना आलिया आणि तिच्या आईला म्हणजे सोनी राजदानला रुग्णालयात जायची गरज का पडली असेल? त्यातही सरकारी रुग्णालयात एवढी मोठी स्टार कशी काय जाईल? या प्रश्नाने आलियाचे चाहते चिंताग्रस्त होते. पण घाबरण्यासारखे काही नाही. खरेतर या माय-लेकी एका दृश्याचे चित्रीकरण करण्यासाठी सरकारी रुग्णालयात गेल्या होत्या.

सोनी राजदान यांचीही या सिनेमात छोटेखानी भूमिका आहे. खऱ्या आयुष्याप्रमाणे सिनेमातही त्या आलियाच्या आईचीच भूमिका साकारताना दिसणार आहेत. सिनेमाच्या संहितेनुसार एका दृश्यात या माय-लेकी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाताना दाखवण्यात आले आहेत. या दोघींना रुग्णालयात पाहण्यासाठी शेकडो चाहते तिथे उपस्थित होते.

सध्या या सिनेमाचे चित्रीकरण पहलगावमध्ये होत असून आलिया चित्रीकरणासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाही दिसते. ‘राझी’ या सिनेमात आलियाचा एक वेगळा लूक पाहता येणार असल्याचे म्हटले जाते. ती चित्रीकरणादरम्यान मेकअप न करताच सेटवर येते. त्यामुळे या सिनेमात आलिया मेकअपशिवाय पाहायला मिळणार की काय?, असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण आलियाने मेकअप केला नाही तरीही ती तेवढीच सुंदर दिसते हो ना?