माझ्या मुली माझ्यापेक्षा हुशार आहेत, स्वतंत्र विचाराच्या आहेत, माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आणि कमावत्या आहेत. त्यामुळे त्यांचे विचार माझ्यासाठी नेहमीच लाखमोलाचे असतात, असे दिग्दर्शक महेश भट्ट नेहमीच मोकळेपणे कबूल करतात. किंबहुना, याच कारणास्तव अजूनही अलियासाठी चित्रपट दिग्दर्शन करायला ते तयार नाहीत. त्यांनी वडील म्हणून ज्या स्वातंत्र्यात मुलींना लहानाचे मोठे केले त्याचे प्रतिबिंब आज जेव्हा त्या मोठय़ा झाल्यावर त्यांना अनुभवायला मिळते तेव्हा ते अचंबित होतात, पण कधीकधी विजयाचा क्षण आपल्याही वाटय़ाला येतो, असे मिश्किलपणे सांगणाऱ्या भट्ट यांनी दिग्दर्शक म्हणून अलियाला पुन्हा एकदा आपल्या विचारांची चमक दाखवून दिली.
महेश भट्ट सध्या ‘नामकरण’ या नवीन मालिकेत व्यग्र आहेत. स्त्रीला तिच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाव्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्व असते का? या एका विचारावर ही मालिका बेतली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीच्या नजरेतून या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या मालिके च्या लिखाणाची प्रक्रिया सुरू असतानाच महेश भट्ट आणि त्यांचे कुटुंब अलियाने घेतलेल्या नवीन आलिशान घरात वास्तव्याला आले. या घरावरून अलियाची फिरकी घेत त्यांनी जे वडिलांचे घर तेच मुलीचे घर.. या नात्याने जे मुलीचे घर ते वडिलांचे झाले पाहिजे ना.. असा वाद सुरू केला. यावर जे मुलीचे घर ते वडिलांचेच घर असे आदर्श उत्तर देण्याचा प्रयत्न अलियाने केला. तिला आणखी पुढे नेत महेश भट्ट यांनी आपल्या मालिकेची मूळ कल्पना ज्या प्रश्नावर आहे त्याबद्दल तिला विचारणा केली. आजही लग्नाआधी मुलगी वडिलांचे नाव लावते आणि लग्नानंतर नवऱ्याचे नाव लावते. मग या दोन्ही नावांशिवाय स्त्रीची स्वत:ची ओळख काय? या प्रश्नाने अलियाही गोंधळली. अलिया निरुत्तर झाली.. मात्र महेश भट्ट सुखावले. त्यांच्या मालिकेला पहिला प्रेक्षक घरातच मिळाला आहे.