‘अलिगढ’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अ प्रमाणपत्र देण्यात आल्यामुळे दिग्दर्शक हंसल मेहता आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यात सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. पहलाज निहलानी यांचा प्रसिद्धीसाठी वापर करण्यापेक्षा मी रस्त्यावर उभे राहून चड्ड्या विकणे पसंत करेन, असे हंसल मेहता यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून ‘अलिगढ’ चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिल्याचा हंसल मेहता यांनी निषेध केला होता. मात्र, हा सगळा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा बनाव असल्याचा आरोप पहलाज निहलानी यांनी केला. निहलानी यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना हंसल मेहता म्हणाले की, या लोकांकडे त्यांच्या चुकीच्या कृत्यांसाठी खूप सोपे स्पष्टीकरण असते. जेव्हा हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्याने आत्महत्या केली तेव्हा हे सगळेजण मिळून तो विद्यार्थी दलितच नव्हता हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचप्रकारे माझा आक्षेप कशाला आहे किंवा मी काय सांगू पाहत आहे, हे समजून घेण्यापेक्षा हे लोक माझ्यावर स्वस्त प्रसिद्धी कमावण्यासाठी हे सगळे करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यांचा तसा दावा असेल तर त्यांनी ‘अलिगढ’ चित्रपटाला योग्य ते प्रमाणपत्र देऊन हा वाद संपवावा. जर मला निहलानी यांच्यावर आरोप करूनच प्रसिद्धी कमवायची असती तर इतकी वर्षे मी चित्रपट बनवण्यात जो वेळ घालवला तो व्यर्थ ठरतो. निहलानी यांचा प्रसिद्धीसाठी उपयोग करण्यापेक्षा मी रस्त्यावर चड्ड्या विकणे पसंत करेन, असे हंसल मेहता यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
उत्तर प्रदेशमधील ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठा’तील प्राध्यापक डॉ. सिरास यांची सत्यकथा ‘अलिगढ’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. डॉ. सिरास हे समलिंगी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले होते. डॉ. सिरास यांची कथा ही एका पत्रकाराच्या संशोधनातून पुढे आली होती. हाच धागा पकडून दिग्दर्शक हंसल मेहता यांनी डॉ. सिरास आणि पत्रकार यांच्यातील मैत्री आणि डॉक्टरांची कथा छापून येईपर्यंत या दोघांमध्ये बदलत गेलेले नातेसंबंध असे अनेक पदर ‘अलिगढ’ या चित्रपटातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी याने डॉ. सिरास यांची व्यक्तिरेखा साकारली असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव याने पत्रकाराची भूमिका केली आहे.