डिसेंबर महिना मराठी नाटय़रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. या एका महिन्यात तब्बल १५ ते २० नवीन नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. मात्र पुढील वर्षांतल्या पुरस्कार सोहळ्याकडे नजर ठेवून डिसेंबरमध्ये ही नाटकांची माळ लागल्याची चर्चाही नाटय़सृष्टीत सुरू आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रंगभूमीवर आलेल्या ‘तक्षकयाग’ या नाटकाद्वारे अविनाश नारकर यांनी पुनरागमन केले आहे. त्याशिवाय सतीश तारे यांचे ‘सगळं कसं गुपचुप’ हे नाटकही रंगभूमीवर दाखल झाले आहे. तर १२-१२-१२च्या मुहुर्तावर ‘इथं नाव ठेवायला जागाच नाही’ या ‘नावात काय आहे’ या एकांकिकेवर आधारित नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला.
ही नाटके वगळता डिसेंबरच्या उत्तरार्धात अनेक नाटके आपला पहिला प्रयोग करणार आहेत. कारागृहाच्या पाश्र्वभूमीवर घडणारे कौटुंबिक व सामाजिक नाटक, या शब्दांत वर्णन केले गेलेले ‘श्री चिंतामणी’चे ‘मायलेकी’ १५ डिसेंबर रोजी रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहनी यांनी केले आहे. तर ट्रेनच्या डब्यात रंगणारे आणि विचित्र नातेसंबंधांची उकल करणारे ‘प्रपोझल’ हे कविता कोठारी निर्मित व राजन ताम्हाणे दिग्दर्शित नाटकही याच दरम्यान दाखल होणार आहे.
त्याशिवाय दिग्दर्शक विजय केंकरे यांची ‘दुर्गाबाई, जरा जपून’ आणि ‘फॅमिली ड्रामा’ ही दोन नाटके एका पाठोपाठ आपापले शुभारंभाचे प्रयोग करणार आहेत. अशोक पाटोळे लिखित ‘दुर्गाबाई’चा शुभारंभाचा प्रयोग २५ डिसेंबर रोजी होणार असून अद्वैत दादरकर लिखित ‘ड्रामा’ २७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर चित्रपट दिग्दर्शनातून लोकांच्या परिचयाचे झालेले दिग्दर्शक शिरीष राणे आपले पहिले नाटक ‘लव्ह इन रिलेशन’ डिसेंबरमध्येच प्रदर्शित करणार आहेत. तसेच भद्रकाली प्रोडक्शनची ‘झोलबच्चन’ आणि ‘बेचकी’ ही दोन नाटकेही रंगभूमीवर आपला पहिला प्रयोग सादर करतील.
पुढील वर्षी फेब्रुवारीपासून विविध पुरस्कार सोहळे सुरू होणार आहेत. यातील बहुतांश सोहळ्यांसाठी ‘डिसेंबपर्यंत नाटकाचा शुभारंभ झालेला असावा’, अशी अट असते. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी डिसेंबरचा मुहूर्त साधला असल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात नाटय़रसिकांसाठी डिसेंबर महिना सुखाचा ठरणार आहे, हे नक्की!
डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणारी नाटके
१. मायलेकी
२. प्रपोझल
३. दुर्गाबाई, जरा जपून
४. फॅमिली ड्रामा
५. झोलबच्चन
६. बेचकी
७. टाइम प्लिज
८. लव्ह इन रिलेशन
९. फू बाई फू फुगडी फू
१०. तक्षकयाग
११. सगळं कसं गुपचुप
१२. इथे नाव ठेवायला जागा नाही
१३. बायको कमाल मेहुणी धमाल