प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला बहुचर्चित ‘बापजन्म’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्रासोबतच हा चित्रपट आता परदेशातसुद्धा प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविले जाणार आहेत. यामध्ये सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे आणि सत्यजित पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

यासंदर्भात निपुण धर्माधिकारी म्हणाले की, ‘मला खूप आनंद होत आहे कि ‘बापजन्म’ हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने परदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.’ निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे.

वाचा : रेमोच्या ‘एबीसीडी ३’मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता 

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सचिन खेडेकर म्हणाले की, ‘बापलेकावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे.’

‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्स’ने केली आहे. २९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.