वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी बच्चन कुटुंबियांसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. ते रविवारी वाराणसी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यासंदर्भात गौप्यस्फोट केला. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष फुटण्याला अमर सिंह जबाबदार असल्याचं मानलं जात आहे. त्याबाबत अमर सिंह यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली.

पत्रकारांशी संवाद साधताना अमर सिंह म्हणाले की, अमिताभ आणि जया बच्चन यांना मी वेगळं केल्याचा आरोप माझ्यावर लावला गेला. पण, अमिताभ आणि जया बच्चन यांनी मी वेगळं केलेल नाही. मी अमिताभ बच्चन यांना ओळखतही नव्हतो, तेव्हापासून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे वेगवेगळ्या घरात राहात होते. प्रतीक्षा आणि जनक या वेगवेगळ्या बंगल्यात दोघे राहात होते. इतकेच काय पण, मी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या भावांमध्येही फूट पाडल्याचा आरोप माझ्यावर लावण्यात आला होता. आता या दोन्ही भावांमध्ये फूट पडल्याने अंबानींचा पैसा मला मिळणार आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. प्रसारमाध्यमं नेहमीच सर्व आरोप माझ्यावर लावतात. कारण त्यांच्या नजरेत मी नायक नसून खलनायक आहे.

आतापर्यंत बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि तिची सासू जया यांच्यात पटत नसल्याच्या चर्चा बॉलिवूड वर्तुळात होत्या. मात्र, आता अमर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एक नवीन बाब सर्वांसमोर आली आहे. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन या दाम्पत्यामधील दुराव्यामुळे बॉलिवूड विश्वात नव्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.